पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात जानेवारी महिन्यात झालेल्या जी 20 परिषदेच्या प्रसिद्धीसाठी महापालिकेने 75 लाख रुपये खर्च केले असून सुशोभीकरणासाठी 1 कोटी 40 लाख आणि आयुक्तांच्या परिषदेसाठी 6 लाख 63 हजार 750 रुपये खर्च दाखवण्यात आला आहे.
15 ते 17 जानेवारी दरम्यान शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये जी 20 परिषद झाली. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून शहरात विविध ठिकाणी रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे करण्यात आली.
या परिषदेची माहिती नागरिकांना व्हावी, तसेच पाहुण्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी व जनजागृती करण्यात आली. यासाठी 75 लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. यामध्ये आकाशवाणीवरील जाहीरातीसाठी 10 लाख, होर्डींगवरून जाहीरात करण्यासाठी 40 लाख आणि विविध वर्तमानपत्रांमध्ये माहिती देण्यासाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. याशिवाय परिषदेच्या अनुषंगाने झालेल्या एकदिवसीय महापालिका आयुक्त परिषदेसाठी 6 लाख 63 हजार 750 रुपये, तर सुशोभिकरण आणि स्वागत कमानींसाठी 1 कोटी 40 लाख असा एकूण 2 कोटी 21 लाख 63 हदार 750 रुपये खर्च दाखवण्यात आला आहे.