एमआयडीसीशीसंबंधित अधिकारी सोडून पोलिसावर कारवाई! | पुढारी

एमआयडीसीशीसंबंधित अधिकारी सोडून पोलिसावर कारवाई!

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : दौंडचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दौंड पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच त्यांची बदली करण्यात आली आहे. कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात मेफेड्रॉन ड्रग्ज प्रकरण घडलेले होते. या घटनेशी पोलिस निरीक्षक यांचा कुठलाही संबंध समोर आला नाही. मात्र, तरीही यासंदर्भात ही बदली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असेल तर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांशी निगडित असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिस निरीक्षक म्हणून साधारण एक महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला होता. यानंतर अवघ्या 10 ते 15 दिवसांनी दौंड पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अर्थकेम लॅबोरेटरीज कारखान्यात ड्रग्ज सापडले होते. पुणे पोलिसांनी मंगळवारी दि. 20 फेब्रुवारीला अर्थकेम कारखान्यावर छापा टाकून 1 हजार 100 कोटींचे 550 किलो ड्रग्ज जप्त केले. चंद्रशेखर यादव यांच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडल्यामुळे यादव यांची बदली केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. वास्तविक, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, औद्योगिक विकास महामंडळ, अन्न व औषध प्रशासन यांचे असते.

अर्थकेम लॅबोरेटरीज कारखान्यात ड्रगसाठा सापडला. कारखान्यात ड्रग्ज तयार केले जात होते तसेच कारखाना बेकायदेशीर सुरू होता. हे तपासण्याची वरील विभागाची जबाबदारी आहे. कारखान्यात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही. पोलिसांना कारखान्यातील पदार्थ व उत्पादनाची माहिती नसते. त्यामुळे आतमध्ये काय चालते, हे फक्त प्रदूषण नियत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासनाचे तसेच संबंधित कारखान्याचे अधिकारी हेच सांगू शकतात. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात पोलिस निरीक्षकाची बदली होते आणि मग येथील कारखान्याशी निगडित असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मग वरिष्ठ पोलिसांचे काय?

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे दौंड तालुक्यातील दौंड, कुरकुंभ व इतर काही भागांतील कार्यक्षत्र येते. कुरकुंभला ड्रगसाठा सापडला आणि यादव यांची बदली झाली, अशी चर्चा आहे. मग पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे पुणे ग्रामीण हे कार्यक्षेत्र येत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा

Back to top button