नारायणगाव बायपास वर खोडद चौकात भुयारी मार्ग होणार

नारायणगाव बायपास वर खोडद चौकात भुयारी मार्ग होणार

नारायणगाव ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव या ठिकाणी असणाऱ्या बायपासला खोडद चौकाजवळ व खडकवाडी या दोन ठिकाणी भुयारी मार्ग केला जाईल. अपघात प्रवण या क्षेत्रातील कामे रविवारी ( दि २८) पासून तातडीने करण्यात येतील, अशी ग्वाही प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी यांनी दिली. यानंतर खोडद चौकात अपघातात मृत पावलेल्या भोर कुटुंबीयांचे नातेवाईक व हिवरे व खोडद येथील नागरिकांनी पुकारलेले रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या कामांना तातडीने सुरुवात न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील खोडद बायपास चौकात उड्डाणपूल बांधण्यात न आल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको करून या ठिकाणी पूल बांधण्यात यावा, तसेच आमदार व खासदार डॉ. अमोल कोल्हे हे दि. ४ डिसेंबरपर्यंत येथे येऊन भेट देऊ शकत नसल्याने तोपर्यंत हा बायपास बंद ठेवण्यात यावा अशी मागणी केली. सोबतच मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचा अंत्यविधी चौकातच करण्याची भूमिका घेतली होती.

यांनतर खोडद बायपास चौकात भुयारी मार्ग केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी यांच्या बरोबर अपघात ग्रस्त क्षेत्राची पाहणी करून चर्चा करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यानुसार सायंकाळी नारायणगाव पोलिस स्टेशन या ठिकाणी महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांबरोबर हिवरे व खोडद येथील रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची चर्चा झाली.

यावेळी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस, जि प सदस्य आशाताई बुचके, खोडद येथील सरपंच सविता गायकवाड, हिवरे येथील सरपंच सोमेश्वर सोनवणे, उपसरपंच दिगंबर भोर ,संतोष नाना खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष सुरज वाजगे, मुकेश वाजगे, मकरंद पाटे ,चीफ इंजिनियर सी डी फकिरे,खासदार कोल्हे यांचे स्वीय सहायक प्रभोदचंद्र सावंत व तेजस झोडगे, खोडद व हिवरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांनी खा. अमोल कोल्हे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बायपासला खोडद चौकात हायमॅक्स दिवे लावण्याचे काम चालू आहे. तातडीने अपघात प्रवण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रम्बलर, दिशादर्शक फलक व इतर उपाययोजना करण्यात आहेत.

खोडद चौक व खडकवाडी ह्या दोन्ही ठिकाणी १२ बाय ४.५ मीटर चा भुयारी मार्ग करण्याचा प्रस्ताव १५ दिवसाच्या आत मध्ये मुंबई कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे सांगितले. मंगळवारी (दि ३०) खा. डॉ.अमोल कोल्हे हे स्वतः केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या कामाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्या संदर्भात चर्चा करणार आहेत, असेही स्पष्ट केले.

यावेळी खोदडच्या सरपंच सविता गायकवाड यांनी अपघातात मृत पावलेल्या महिलेच्या दोन वर्षाच्या मुलाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रस्ताव पाठवून त्यांना आर्थिक मदत करण्यात येइल असे आश्वासन दिले. तर मनीषा नंदाराम भोर यांनी भुयारी मार्गाचा प्रकल्प वर पाठवणार आहेत मात्र तो मंजूर होऊन येई पर्यंत किती लोक वर पाठवायची? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी जि. प .सदस्या आशाताई बुचके यांनी प्रकल्प मुंबईच्या कार्यालयातून दिल्लीपर्यंत नेण्यास आपण पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यावेळी खोडद येथील नागरिकांनी काम तातडीने चालू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

या दुर्दैवी घटनेत ज्या भगिनीचे निधन झाले त्या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करतो. भोर कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. बायपास चौक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाला सकाळीच सूचना दिल्या होत्या. ही घटना समजल्यानंतर लगेच पाहणी करून तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकातील हायमास्ट एक दिवसात सुरू करण्याविषयी विद्युत विभागाला सक्त ताकीद दिलेली आहे. तिसऱ्या फेजमध्ये खोडद रोड भुयारी मार्गाचा प्रस्ताव पुणे विभागाकडून केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. मी स्वतः ३० तारखेला अधिवेशन दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा भुयारी मार्ग लवकरात लवकर मंजूर करावा यासाठी पाठपुरावा करणार आहे. हा भुयारी मार्ग होणे हीच या भगिनीला खरी श्रद्धांजली ठरेल. यापुढे कुणावरही अशी दुर्दैवी वेळ येणार नाही यासाठी पूर्ण प्रयत्न करेन.
-डॉ अमोल कोल्हे
खासदार शिरूर लोकसभा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news