दुष्काळी झळा; गावांना टँकर सुरू : पाणी योजना फसल्याचा परिणाम | पुढारी

दुष्काळी झळा; गावांना टँकर सुरू : पाणी योजना फसल्याचा परिणाम

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजना अधिकारी आणि ठेकेदारांच्या खाबूगिरीने पूर्ण होऊ न शकल्याने दौंड तालुक्यातील खोर, पडवी, जिरेगाव, यवत आदी गावांनी पाण्यासाठी टँकरची मागणी केलेली आहे. यवत गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या योजनेतून जवळपास तीस कोटी रुपये खर्च केले जात आहेत. 7 ऑगस्ट 2022 रोजी एन. व्ही. खरोटे या ठेकेदाराला काम मिळाले आहे. 27 महिने काम पूर्ण करण्याचा कालावधी होता. मात्र, अद्याप काम अपूर्ण आहे. ठेकेदाराने फोन बंद करून ठेवला आहे. अधिकारी यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. या सर्व गोंधळात काम अर्धवट राहिले आहे. परिणामी, लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

ज्यांना नळाचे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार होते, त्यांना आता टँकरच्या माध्यमातून येणारे पाणी प्यावे लागणार आहे, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. यवत गावातील इंदिरानगर, माणकोबाचा वाडा, मलभारेवस्ती, वाघदरवस्ती, पिंगळेवस्ती, कुलवस्ती, कासाबाईवस्ती, रावबाचीवाडी, खैरेवस्ती, सहकारनगर, दोरगेवाडी, महालक्ष्मीनगर आदी परिसरात पाणीटंचाई आहे. आम्हाला टँकरने पाणी मिळावे म्हणून पंचायत समितीकडे त्यांनी मागणी केलेली आहे. पडवी गावच्या योजनेला जलजीवनमधून 1 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद आहे. 24 ऑगस्ट 2022 ला कामाची सुरुवात झालेली होती. काम पूर्ण करण्यासाठी एक वर्ष मुदत देण्यात आलेली होती. मागच्या उन्हाळ्यात पाण्याची जाणवलेली अडचण पुढच्या उन्हाळ्यात भासणार नाही, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, वर्ष निघून गेले, तरी अद्याप काम अपूर्ण आहे. परिणामी, नागरिकांच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागत आहेत.

शासनाच्या दोन कोटींचा गावांसाठी कोणताच फायदा झालेला नाही. अधिकारी आणि ठेकेदारांनी हात धुऊन घेतले आहेत, असा आरोप होत आहे. अधिकार्‍यांनी या योजनेकडे प्रामाणिकपणे लक्ष दिले नसल्याने योजना अडचणीत आहेत, असे सांगून ठेकेदारांनी आतापर्यंत 1 कोटी 10 लाख रुपये घेतले आहेत. अधिकार्‍यांच्या शिफारशीनुसार ते दिले गेले आहेत. यातून अधिकारी आणि ठेकेदार यांच्या कारभाराने योजना अपुरी राहून नागरिकांना टँकरचे पाणी प्यावे लागणार आहे. या भागातील देशमुखवाडी, नानामळा, गायकवाडमळा, चिंचकूट आणि रामोशीवस्ती या परिसराला नळाच्या पाणीपुरवठा योजनेचा लाभ सोडा टँकरच्या पाण्यानेही त्यांची तहान उन्हाळ्यात भागवावी लागणार आहे, अशी परिस्थिती असल्याने यांच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दौंड पंचायत समितीकडे गेलेला आहे.

जिरेगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास 3 कोटी 77 लाख 27 हजार रुपयांचा निविदा प्रस्ताव रकमेचा कारभार शासनाने करून ठेवला असून, व्ही. एम. जावळे नावाचे ठेकेदार काम करीत आहेत. 14 फेब—ुवारी 2023 रोजी कामाला सुरुवात झालेली असून, 13 जानेवारी 2024 रोजी कामकाजाची मुदत संपलेली आहे. अद्याप या भागात योजना अपूर्ण असल्याने गावठाण, मेरगळ, लाळगे, मचाले, भंडलकर, खोमणे, नरोटे, जांभळे, जगताप, लोणकर आणि केसकरवस्ती, जाधववाडी आदी परिसराला टँकरच्या पाण्याची गरज भासली आहे. योजनेचे काम किती झाले, याची खरी माहिती ठेकेदाराला आणि अधिकार्‍यांना असून, गावकरी याबाबत अंधारात आहेत, असे असतानाही 40 लाखा रुपये ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. या सर्व बाबींचा विचार केला असता जलजीवन ही योजना नागरिकांपेक्षा ठेकेदारांच्या भल्याची जास्त आहे की काय? हा प्रश्न ऐरणीवरचा विषय असला तरी कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र अद्यापही अर्धवटच राहिला आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर टँकरच्या पाण्याची वेळ
आलेली आहे.

खोर गावालाही टँकरची शक्यता

खोर गावालाही टँकर लागण्याची शक्यता निर्माण झालेली असून, मागणी प्रस्ताव लवकरच येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली आहे. तालुक्यात टँकर मागणी गावांची पाहणी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे.

हेही वाचा

Back to top button