बंडल कुठून आले अन् कुठे गेले; महापालिकेकडून ना चौकशी ना कारवाई | पुढारी

 बंडल कुठून आले अन् कुठे गेले; महापालिकेकडून ना चौकशी ना कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका अधिकार्‍याच्या टेबल ड्रॉव्हरमध्ये लाखांच्या रोख रकमेच्या नोटांचे बंडल सापडण्याच्या घटनेनंतरही प्रशासनाकडून बुधवारी या प्रकरणाची साधी चौकशीही केली नसल्याचे समोर आले आहे. सापडलेल्या रकमेशी या अभियंत्याचा संबंध काय आणि ती रक्कम नक्की कोणी गायब केली, या सर्व प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत. मंगळवारी दुपारी महापालिका भवनातील पथ विभागाच्या कार्यालयात एका कनिष्ठ अभियंत्याच्या टेबल ड्रॉव्हरमध्ये पाचशेंच्या नोटांचे तीन ते चार लाखांच्या रकमेचे बंडल असलेले पाकीट मआपफच्या कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणले.
त्यावर संबंधित अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात बुधवारी मात्र या प्रकारावर पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली गेली नसल्याचे समोर आले. आयुक्तांनीही चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. एवढी मोठी घटना होऊन वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याबाबत साधी दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडूनच या प्रकरणावर पडदा तर टाकला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, ही रक्कम एका माजी आमदाराशीसंबंधित ठेकेदार कंपनीकडून आली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकारानंतर ती रक्कम नक्की कोणी गायब केली, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
संबंधित प्रकरणाची माहिती घेतली जात आहे. अतिरिक्त आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांशी केलेल्या चर्चेनुसार पुढील कारवाई केली जाईल.
-अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख.
हेही वाचा

Back to top button