आणि रुबी हॉलपासून रामवाडीपर्यंत पुण्यातील मेट्रो धावू लागली..

आणि रुबी हॉलपासून रामवाडीपर्यंत पुण्यातील मेट्रो धावू लागली..
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला आणि रुबी हॉलपासून रामवाडीपर्यंत पुण्यातील मेट्रो धावू लागली. वनाझ ते रामवाडी या मेट्रोमार्गावरील शेवटच्या टप्प्यात आज मेट्रो सुरू झाल्याने या सोळा किमीच्या संपूर्ण मार्गावर प्रवाशांना मेट्रोप्रवास करता येणार आहे.   पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गावरील मेट्रोला फुलांनी सजविण्यात आली होती. ती धावण्यासाठी सज्ज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वाजून 23 मिनिटांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर मेट्रो रामवाडीच्या दिशेने रवाना झाली. त्यामध्ये महापालिका, मेट्रोचे अधिकारी आणि भाजपचे शहर पदाधिकारी उपस्थित होते, तर इतर  पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
या वेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.  रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रोमार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके असून, हा मार्ग 5.5 किलोमीटरचा आहे. या मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो दुसरीकडे हलविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्यात आले आहे. लवकरच
 हे स्थानक सुरू केले जाणार आहे. वनाझ ते रामवाडी हे मार्ग 16 किलोमीटरचे असून, याचे तिकीट 30 रुपये असून, 36 मिनिटांत हे मार्ग  पूर्ण करता येणार आहे. मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी 1 ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा 9.7 किलोमीटरचा मार्ग याआधी सुरू झाला होता.

असा आहे तिकीट दर

  • वनाझ ते रामवाडी 30 रु.
  • पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट 30 रु.
  • वनाझ ते पिंपरी चिंचवड 35 रु.
  • रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड 30 रु.
  • वनाझ ते डेक्कन जिमखाना 20 रु.
  • पिंपरी-चिंचवड ते पुणे स्टेशन 30 रु.

भाजप पदाधिकार्‍यांचीच गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविणार असल्याने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुबी हॉल आणि रामवाडी स्थानकावर जमले होते. त्यामध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेश पांडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केले आणि आज त्यांच्याच हस्ते उद्घाटन होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने कळ दाबून रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचा शुभारंभ केला.
वनाझ ते रामवाडी मेट्रो सुरू झाली असून, आमचा या मार्गावरील पहिलाच प्रवास आहे. आमचे नातेवाईक कोथरूड परिसरात राहतात. त्यांच्याकडे आमचे नेहमीच येणे-जाणे असते. आतापर्यंत रिक्षा किंवा पीएमपीएमएलने प्रवास करावा लागत होता. तसेच त्यासाठी अधिकचा वेळ आणि पैसे खर्च होत  होते. आता मेट्रोमुळे केवळ 30 रुपयांत आम्ही रामवाडीपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे पैसे आणि वेळ कमी खर्च होणार आहे.
– कल्याणी कुलकर्णी, प्रवासी
कल्याणीनगर येथून गरवारे कॉलेजला येण्यासाठी दररोज मोठी कसरत करावी लागत होती. काही महिन्यांपूर्वी रुबी हॉलपर्यंत जाऊन तेथून मेट्रोने प्रवास करीत होतो. परंतु, आता कल्याणीनगर येथून मेट्रो उपलब्ध झाल्याने अर्ध्या तासात कॉलेजला जाता येईल. त्यामुळे आम्हाला मेट्रोचा फायदा होईल.
– विराज फाटक, विद्यार्थी
मी डेक्कन परिसरात एका खासगी कार्यालयात  कामाला आहे. नगर रस्त्यावरून डेक्कनला येण्यासाठी सुमारे एक ते सव्वा तास वेळ जात होता तसेच अनेकवेळा कार्यालयात वेळेत पोहचणे शक्य होत नव्हते. परंतु, आता रामवाडी येथून थेट मेट्रो सुरू झाली आहे. आज पहिलाच दिवस असून, आता दररोज कार्यालयाला येण्यासाठी मेट्रोचा वापर करणार आहे.
– शुभम साळुंखे, कामगार
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news