पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पिंपरी ते निगडी मेट्रो कामाचे ऑनलाईन भूमिपूजन | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पिंपरी ते निगडी मेट्रो कामाचे ऑनलाईन भूमिपूजन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्टेशन ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक या 4.519 किलोमीटर मेट्रो विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून बुधवारी (दि.6) करण्यात आले. या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी ते दापोडी हा 12.50 किलोमीटर अंतराचा मार्ग पूर्ण होणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना निगडीतून थेट स्वारगेटपर्यंत ये-जा करता येणार आहे. पिंपरी ते निगडी हा एलिव्हेटेड (उन्नत मार्ग) आहे. हा मार्ग सेवा रस्त्यावर तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 910 कोटी 18 लाख इतका आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक आणि निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक असे चार स्टेशन असणार आहेत.

हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर निगडी ते स्वारगेट असा थेट प्रवास करता येणार आहे. या मार्गावर असलेला निवासी भाग, शैक्षणिक संस्था, औद्योगिक भाग येथील कर्मचारी व रहिवासी यांना मेट्रोचा फायदा होणार आहे. पिंपरी स्टेशनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक, मेट्रो व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मार्गिका अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

पिंपरी ते निगडी या नव्या विस्तारित मार्गावर चार स्टेशन्स असणार आहेत. चिंचवड स्टेशनमधील पिंपरी पोलिस ठाणे, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक आणि निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे असे चार स्टेशन्स तयार केले जाणार आहेत. प्रत्येक स्टेशनमधील अंतर सुमारे 1 किलोमीटर इतके आहे. मार्गिकेचे काम 130 आठवड्यात (अडीच वर्षे) पूर्ण करण्याची मुदत आहे.

हेही वाचा

Back to top button