श्रीक्षेत्र वीरला ”सवाई सर्जाच चांगभलं” चा जयघोष; रंगाचे शिंपण करत यात्रेची सांगता

श्रीक्षेत्र वीरला ”सवाई सर्जाच चांगभलं” चा जयघोष; रंगाचे शिंपण करत यात्रेची सांगता

सासवड : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रेची सांगता रंगाचे शिंपण या प्रथेनुसार करण्यात आली. गेली दहा दिवस सुरू असलेल्या उत्सवाची सांगता मानकरी समस्त जमदाडे परिवाराच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपन करून पारंपरिक पध्दतीने करण्यात आली. यावेळी मंदिरात 'सवाई सर्जाचा चांगभलं' चा जयघोष करून मानाच्या पालख्यांवर फुलांची उधळण करण्यात आली.

संबंधित बातम्या 

यानिमित्त मंगळवारी (दि. ५) पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता धुपारती होऊन कोडीतची मानाची पालखी प्रथम देऊळवाड्यात आली. त्यापाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील वीस गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काठ्या ढोल ताशा सह अबदागिरी, निशान, छत्री, दागिदार व मानकऱ्यांसह मंदिरात आल्या. मानाच्या पालख्या व काठ्यांनी मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळ वाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, दादा बुरुंगले यांची भाकणूक सांगण्यात आली.

ज्याची गादी त्याला मिळणार

यावर्षी बाजरीचे पीक जोमात येणार असून मृगाचे पाणी चार खंडात पडेल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. हत्तीचे पाणी चार खंडात पडून जनतेचे समाधान होईल. उतरा, पूर्वा, तीन खंडात पडेल. चौथ्या खंडात साधारण राहील. गाई, गुरे रोगराई हटली आहे. मनुष्याच्या मागे खाता- पिता आटापिटा राहिल ज्याची गादी त्याला मिळणार असल्याचे भविष्यवाणीत सांगण्यात आले.

भाकणुकीनंतर दुपारी १:३० वाजता देवाचे मानकरी समस्त जमदाडे यांच्यामार्फत देवाला नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपण करण्यात आले. यावेळी फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर सर्व पालख्या आपापल्या स्थळी गेल्या.

दहा दिवस सुरू असलेला यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, सचिव अभिजित धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, विश्वस्त हनुमंत (बाबुकाका) धुमाळ, नामदेव जाधव, राजेंद्र कुरपड, संजय कापरे, दत्तात्रय समगीर यांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news