लाव रे तो व्हिडीओ! जुने व्हिडीओ सर्वच पक्षांची डोकेदुखी; सोशल मीडियावर जुगलबंदी

लाव रे तो व्हिडीओ! जुने व्हिडीओ सर्वच पक्षांची डोकेदुखी; सोशल मीडियावर जुगलबंदी

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले असून, पक्षफुटीपूर्वीचे जुने व्हिडीओ काटछाट करून सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. पूर्वीच्या भूमिका आणि आता बदललेल्या भूमिकांच्या व्हिडीओची जोरदार जुगलबंदी सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. परंतु, हे जुने व्हिडीओ लोकसभा निवडणूक प्रचारात सर्व पक्षांची डोकेदुखी
ठरत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी वेगळे वातावरण होते. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. भाजप आणि शिवसेना, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या समविचारी पक्षांनी एकत्र निवडणुका लढविल्या.

पण, सत्तेत मात्र भाजपला बाजूला करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी आली. अडीच वर्षे एकत्र सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यानंतर मोठी फूट पडली. राज्यात एका पक्षाचे दोन व दोनाचे चार पक्ष झाले, राजकीय नेते, मंत्री, खासदार, आमदार यांच्या भूमिका बदलत गेल्या. या बदललेल्या भूमिका आणि त्या-त्या वेळी केलेली भाषणे, केलेली वक्तव्ये आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत विरोधाभास निर्माण करणारी आहेत. नेते, मंत्री, खासदार, आमदारांचे हेच जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे तसेच मतदारांचे मनोरंजन करण्याचे काम करत आहेत.  आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात त्यांचेच कट्टर समर्थक व सध्या शरद पवार गटामध्ये सहभागी झालेले देवदत्त निकम यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' सांगत जाहीर सभेत चांगली रंगत आणली होती.

देवदत्त निकम यांच्या या व्हिडीओवर दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देवदत्त निकम यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून पोलखोल करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुने व्हिडीओ पोस्ट करत भूमिका बदलली की भाषा बदलते, असे सांगितले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील त्यांनी संसदेत बैलगाडा शर्यत, पुणे- नाशिक बाह्यवळण मार्ग, यासंदर्भातील जुने व्हिडीओ पोस्ट करून खा. कोल्हे कशाप्रकारे खोटा प्रचार करत आहेत, हे लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, बदललेल्या राजकीय भूमिकांचे जुने व्हिडीओ प्रचारात रंगत आणणार असले तरी ते नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news