पोलिस, शिक्षक भरतीत मराठा आरक्षणाचा लाभ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

पोलिस, शिक्षक भरतीत मराठा आरक्षणाचा लाभ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारामती, पुढारी वृत्तसेवा : 75 हजार नोकर्‍या देऊ, असे राज्य सरकारने जाहीर केले होते, तो आकडा आता 1 लाख 60 हजार नोकर्‍यांवर जाऊन पोहोचला आहे. राज्यात मोठी पोलिस, शिक्षक भरती होत असून, मराठा आरक्षणाचा लाभ या भरतीमध्ये मिळत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विकासाच्या कामात सरकार कधी आखडता हात घेणार नाही, अजित पवार यांच्याकडे तर राज्याच्या तिजोरीच्याच चाव्या दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

बारामतीत शासनातर्फे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, दिलीप वळसे-पाटील, उदय सामंत, खा. शरद पवार, डॉ. नीलम गोर्‍हे, खा. सुप्रिया सुळे, आ. दत्तात्रय भरणे, माजी मंत्री विजय शिवतारे, सुनेत्रा पवार आदींची यावेळी उपस्थिती होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी बारामतीतील पोलिस उपमुख्यालय, अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, वाहतूक शाखा कार्यालय, बारामती बसस्थानक या इमारतींचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. पोलिस वसाहतीमधील सदनिका, वाहनांचे तसेच वन विभागातील नियुक्ती पत्रांचे प्रातिनिधिक वाटप पार पडले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात नागपूर, लातूर, नगर येथे महारोजगार मेळावे झाले. त्यांचे रेकॉर्ड तोडणारा कार्यक्रम बारामतीत होत आहे. अजित पवार यांनी त्याचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. बारामती हे विकासाचे मॉडेल आहे. येथील विकासात शरद पवार, अजित पवार यांचे योगदान आहे.

फडणवीस म्हणाले, महारोजगार मेळावा हा उद्योगांना या ठिकाणी बोलावून तरुणांच्या हाताला काम देण्याचा एक उपक्रम आहे; पण गेले दोन-तीन दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे आणि माध्यमाचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत, या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या दोन-तीन दिवसांत मिळवून दिली आणि हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे की, एखादे चांगले काम जर करायचे असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की, आम्ही सगळे मिळून चांगले काम करू शकतो.

खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिगणांचे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी राज्य सरकार जी पावले टाकत आहे त्याचे समाधान आहे. राजकारण असते; पण नव्या पिढीला रोजगार मिळण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल, तर त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही यासाठी जे जे कराल त्याला साथ राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ना. मंगलप्रभात लोढा यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविक कौशल्य रोजगार विभागाच्या आयुक्त डॉ. निधी चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळे-पाटील यांनी केले. उपायुक्त अनुपमा पवार यांनी आभार मानले.

करायचे तर एक नंबर, नाही तर आपण त्याच्या नादाला लागत नाही. अजून विकासकामे करायची असून, त्यासाठी शिंदे, फडणवीस यांनी साथ द्यावी, सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीला राज्यात क्रमांक एकचा तालुका केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Back to top button