आ. संजय जगताप यांना पुरंदरमध्ये धक्का; विश्वासू सहकारी गेले अजित पवारांच्या गटात | पुढारी

आ. संजय जगताप यांना पुरंदरमध्ये धक्का; विश्वासू सहकारी गेले अजित पवारांच्या गटात

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर-हवेलीचे काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे व महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे महासचिव, सासवडचे माजी स्वीकृत नगरसेवक गणेश जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोघांच्या अचानक पक्ष सोडून जाण्याने पुरंदर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली असून, आ. जगताप यांना हा मोठा राजकीय धक्का आहे.आ. जगताप यांचे हे दोन शिलेदार शुक्रवारी सकाळी अजित पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी राष्ट्रवादीत सामील झाले.

दत्ता झुरंगे हे तालुक्यातील काँग्रेसचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य होते. ते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच होते. 2012 साली पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत पंचायत समितीची उमेदवारी मिळवली व त्यामध्ये त्यांना यशही आले होते. पुढील काळात 2017 साली जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली व विजय संपादन केला होता. आमदार संजय जगताप यांचे खंदे समर्थक असलेले हे दोन शिलेदार अचानक राष्ट्रवादीमध्ये गेले कसे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लोकांमध्ये शुक्रवारी सकाळपासूनच ही चर्चा सुरू आहे. मात्र, या संदर्भात गणेश जगताप यांच्याकडे विचारणा केले असता ते म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची चांगली संधी असल्यामुळे त्याचबरोबर त्यांचे नेतृत्व चांगलं काम करत असल्याने आपण त्यांच्या पक्षाद प्रवेश केला आहे.

याबाबत झुरंगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण अधिकृत रित्या हा प्रवेश केल्याचे सांगितले, तर लवकरच पुरंदर तालुक्यामध्ये जाहीर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. या वेळी माझे अनेक सहकारी पक्षात प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले. सध्या आमदार संजय जगताप हे मुंबई येथे अधिवेशनात असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही, तर ते पुरंदरमध्ये आल्यावर त्यांची याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळेल.

हेही वाचा

Back to top button