मस्तानी तलावाला प्राप्त होणार गतवैभव; पुरातत्व विभागाकडून 2 कोटी मंजूर | पुढारी

मस्तानी तलावाला प्राप्त होणार गतवैभव; पुरातत्व विभागाकडून 2 कोटी मंजूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वडकीतील दिवे घाटाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक मस्तानी तलावाच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागामार्फत 2 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने मस्तानी तलावाच्या विकासकामाला गती येणार आहे. पुरातत्व खात्याच्या परवानगीअभावी बरीच वर्ष येथील काम खोळंबले होते. मात्र, आता पुरातत्व खात्यानेच दुरुस्तीसाठी निधी दिल्याने या कामाला मुहूर्त मिळाला आहे. भूमिपूजन नुकतेच ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

तलावातील गाळ काढून खोली वाढविणे, संरक्षक भिंत डागडुजी तसेच इतर कामे करण्यात येणार आहेत. मस्तानी तलाव 14 एकर क्षेत्रामध्ये असून, त्यामध्ये 40 फुटांहून अधिक पाणीसाठा राहतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने मस्तानी तलाव कोरडा पडत चालला आहे. त्यातच प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या तलावाची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तलावाची चिरेबंदी संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळली आहे. झाडेझुडपे, गवत वाढले आहे. डोंगरावरून पावसाच्या पाण्याबरोबर दगड, माती थेट तलावात पडत असल्याने तलावाचे पात्र कमी झाले आहे.

तलावाच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांकडून वारंवार दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. अखेर खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पर्यटनस्थळ म्हणून मस्तानी तलावाचा विकास केला, तर पर्यटनासोबतच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर येथे पूरक व्यवसाय सुरू होऊन रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

हेही वाचा

Back to top button