सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी नगरपरिषदेत ठिय्या : लाखोंचा खर्च पाण्यात | पुढारी

सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी नगरपरिषदेत ठिय्या : लाखोंचा खर्च पाण्यात

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : बंद पडलेले शहरातील सीसीटीव्ही सुरू करावेत, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी पाथर्डी नगरपरिषद कार्यालयात बैठा सत्याग्रह करून आंदोलन केले. येत्या आठ दिवसांत पालिका हद्दीतील सर्व बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील, असे नगरपरिषद प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर गर्जे यांनी आंदोलन मागे घेतले.
पाथर्डी नगरपरिषद हद्दीमधील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी लाखो रुपयांची बंद असलेली सीसीटीव्ही यंत्रणा चालू करण्यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकार्‍यांच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी गर्जे आंदोलन सुरू केले होते.

या वेळी राहुल ढाकणे, सोनल जोजारे, सिद्धू मानूरकर, गणेश घुले, रमेश केरकळ, गंगा जातेगावकर, लक्ष्मण पावटेकर, उबेर आतार आदी उपस्थित होते. गर्जे म्हणाले की, पाथर्डी नगरपरिषदेने सुमारे पन्नासच्या जवळपास कॅमेरे शहरातील प्रत्येक प्रमुख चौकासह मुख्य ठिकाणी बसवले होते. त्यासाठी लाखोंचा खर्च झाला. सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम सुरू झाल्यापासून कधी बंद, तर कधी चालू असा खेळ सुरू होता. कॅमेरे बंद असूनही ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले.

आजच्या स्थितीला सर्व कॅमेरे बंद पडूनही ठेकेदाराने दुरुस्त केले नाहीत. त्यामुळे यासाठी करण्यात आलेला लाखो रुपये खर्च पाण्यात गेला आहे, असे गर्जे यांनी सांगितले. नगरपरिषदेने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले असून, ते कधी सुरू होणार अशा मजकुराचे फ्लेक्स गर्जे यांनी शहरातील प्रमुख चौकात लावून यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होत. आता आठ दिवसांत प्रशासनाने लेखी स्वरूपाचे आश्वासन दिले असून, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होणार का हेच आता पहावे लागणार आहे.

हेही वाचा

Back to top button