Kurkumbh drug case : नाव खोकल्याच्या औषधाचं अन् उत्पादन मेफेड्रॉनचं! | पुढारी

Kurkumbh drug case : नाव खोकल्याच्या औषधाचं अन् उत्पादन मेफेड्रॉनचं!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभमधील अर्थकेम लॅबोरेटरीमध्ये खोकल्याच्या औषधाच्या कन्टेंटच्या नावाखाली मेफेड्रॉनचे उत्पादन सुरू होते. यापूर्वी अटक करण्यात आलेला केमिकल इंजिनिअर युवराज भुजबळ याच्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील आठवड्यात याच कंपनीतून पोलिसांनी कोट्यवधींचे मेफेड्रॉन जप्त केले होते. या प्रकरणात आतापर्यंत वैभव भारत माने (वय 40, खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय 35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (वय 46,रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम, मुंबई), तर दिल्ली येथून दिवेश भुतिया (वय 39) आणि संदीप कुमार (वय 42, दोघेही रा. दिल्ली), आयुब अकबर मकानदार (रा. सांगली) आणि नुकतेच पश्चिम बंगालमधून सुनील विरेंदनाथ बर्मन याला अटक करण्यात आली आहे. त्याला पोलिस प्रवासी कोठडीद्वारे पुण्यात आणत आहेत.

तपासात विश्रांतवाडीतील गोदामाव्यतिरिक्त लोहगावमधील गोदाम पोलिसांनी शोधून काढले होते. हे गोदाम थॉमस नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे आहे. त्याने ते अशोक मंडलच्या मार्फत सुनील बर्मन याला भाडेतत्त्वावर दिले होते. या गोदामाची पाहणी केल्यानंतर या गोदामात मोठ्या प्रमाणावर पोलिसांना ड्रम आढळून आले होते. त्यातील एका ड्रममध्ये मेफेड्रॉन साठवून ठेवल्याचा व त्याची पुढे डिलिव्हरी दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. कारण एका ड्रमची पोलिसांनी बारकाईने तपासणी केल्यानंतर त्यातून पोलिसांना 75 ग्रॅम मेफेड्रॉन सापडले होते. या गोदामाची जबाबदारी ही सुनील बर्मन आणि अशोक मंडल या दोघांवर होती. या गोदामात आढळून आलेले ड्रम हे कुरकुंभमधील अर्थ केम कारखान्यात आढळून आलेल्या ड्रमप्रमाणेच असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. कुरकुंभमधील कारखान्यातूनच लोहगावमधील गोदामात मेफेड्रॉन आल्याचे व येथून पुढे ते पुढील टार्गेटपर्यंत पोहोचविले गेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे याबाबत माहिती असलेल्या व पोलिसांना गुंगारा देणार्‍या सुनील बर्मनला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, लोहगाव, सांगली, कुरकुंभचा अर्थ केम कारखाना तसेच दिल्लीतून तब्बल 1880 किलो असे 36 हजार कोटींहून अधिकचे मेफेड्रॉन पकडले आहे. हे पकडलेले मेफेड्रॉन कुरकुंभमधील कारखान्यात उत्पादित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हे मेफेड्रॉन दिल्लीमधून पुढे लंडनलादेखील निर्यात झाल्याचे तपासात पुढे आले आहे.
अर्थ केम कारखान्यात वस्तूला गंज लागू नये म्हणून पेंटमध्ये कन्टेंट म्हणून वापरले जाणारे उत्पादन, मलेरियाच्या औषधामध्ये वापरला जाणार कन्टेंट ही दोन उत्पादने घेतली जात होती. त्याबरोबरच न्यू पुणे जॉबचे नाव वापरून खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली मेफेड्रॉन तयार होत असल्याचे समोर आले आहे. यातील केमिकल इंजिनिअर भुजबळने याबाबत माहिती दिली आहे. त्याबरोबरच कोणता फॉर्म्युला खोकल्याच्या औषधाच्या कन्टेंटच्या उत्पादनासाठी तयार केला होत? अन् ऐनवेळी दुसराच फॉर्म्युला वापरला गेलेल्या तपासात सांगितले आहे. असे जरी असले तरी तो सांगत असलेली बाब पडताळणी करून पाहावी लागणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

140 किलो मेफेड्रॉनची लंडनला तस्करी

पुण्यातून दिल्लीमध्ये मेफेड्रॉनची तस्करी झाल्यानंतर विमानाद्वारे आंतरराष्ट्रीय पॅकिंगप्रमाणे हे पॅकिंग करून ते पुढे लंडनला पाठविले जात असल्याची बाब तपासात समोर आली आहे. प्राथमिक तपासात 140 किलो मेफेड्रॉनची तस्करी झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे. परंतु, तांत्रिक पुरव्यांच्या आधारे पोलिसांकडून सर्व टॅली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button