Rajendra Pawar : मी राजकारणात आलो असतो, तर पवार घराण्यात फूट पडली असती; राजेंद्र पवार यांचा गौप्यस्फोट | पुढारी

Rajendra Pawar : मी राजकारणात आलो असतो, तर पवार घराण्यात फूट पडली असती; राजेंद्र पवार यांचा गौप्यस्फोट

बारामती; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी आपल्याला राजकारणात येण्यापासून रोखले नसते, तर आज पवार कुटुंबात जी राजकीय स्थिती आहे, ती तेव्हाच दिसली असती. अजित पवार यांना राजकारणात करिअर करता यावे, यासाठी मला रोखण्यात आले, असे मत शरद पवारांचे दुसरे पुतणे, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी बुधवारी व्यक्त केले. कुटुंबप्रमुख म्हणून पूर्वीही आपण शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. यापुढेही राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. (Rajendra Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका जाहीर केल्यानंतर त्याला उत्तर देणार्‍या एका निनावी पत्राची बारामतीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘बारामतीकरांची भूमिका’ या शीर्षकाखाली हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यासंबंधी राजेंद्र पवार यांनी भाष्य केले, ते म्हणाले, लोकांच्या भावना दाबल्या जात असतील, तर त्या निनावी पत्राच्या रूपाने बाहेर पडतात, याच पद्धतीने कोणा बारामतीकराचे विचार या पत्राद्वारे बाहेर आले असू शकतील.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याऐवजी तुम्हाला राजकारणात संधी दिली असती, तर काय घडले असते, या प्रश्नावर राजेंद्र पवार म्हणाले, त्यावेळी स्व. आप्पासाहेब पवार हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पॅनेलप्रमुख होते. त्यांनी अजित पवार यांना संधी दिली. मी शेती व व्यवसाय बघत होतो. पुढे शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते राजकीय क्षेत्रात आले. तद्नंतरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत मी दोनदा रस दाखवला; परंतु शरद पवार यांनी मला या क्षेत्रात जाऊ नये, असे सांगितले. ते प्रमुख असल्याने त्यांचा तो विचार किंवा आदेश मी मानला. तो त्यांचा राजकीय निर्णय होता. त्यांना राजकारण अधिक चांगल्या पद्धतीने समजते. त्या काळात कदाचित मी राजकारणात आलो असतो, तर आज जी परिस्थिती दिसते आहे त्याची सुरुवात तेव्हाच दिसली असती.
लोकांना वस्तुस्थिती माहीत नसते

पवार कुटुंबातील खदखद रोहित पवार यांना आमदारकीची संधी दिल्यापासून वाढली का, या प्रश्नावर ते म्हणाले, मला असे वाटत नाही. पवार घराण्यात काय चालते, काय नाही, हे लोकांना डोकावून पाहायला आवडते. परंतु, त्यांना वस्तुस्थिती माहीत नसते. पार्थ पवार हे खासदारकीसाठी मावळमधून उभे राहिले होते. पिंपरी- चिंचवड भागात त्यांचा वावर असतो. त्यामुळे ते तिकडे उभे राहिले. रोहित पवार यांना रस असता, तर ते बारामतीतून उभे राहिले असते. तसे न करता त्यांनी कर्जत-जामखेडला जाऊन तो मतदारसंघ तयार केला. वाद होऊ नये, हीच त्यामागे भूमिका होती.

हेही वाचा 

Back to top button