पदवी, पदव्युत्तर पदवीधारक तृतीयपंथी करणार न्यायदान | पुढारी

पदवी, पदव्युत्तर पदवीधारक तृतीयपंथी करणार न्यायदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तृतीयपंथींना न्यायालयातील प्रक्रियेचा एक भाग होता यावे, म्हणून येत्या लोकअदालतीत तृतीपंथींचा पॅनेलमध्ये समावेश करण्यात येणार आहे. पदवी व पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या व सामाजिक क्षेत्रात दोन वर्षांपासून 20 वर्षांपर्यंत अनुभव असलेल्या 13 जणांची नियुक्ती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत केली आहे. त्यामुळे तृतीयपंथींना न्यायदानाची प्रक्रिया अधिक जवळून समजून घेत पक्षकारांमधील वाद तडजोडीतून मिटवता येणार आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच 13 तृतीयपंथींना लोकअदालतीत पॅनेल सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात येत आहे.

तृतीयपंथींना आज समाजात सर्वच स्तरांत मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांचा न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग वाढावा म्हणून आम्ही ही निवड करीत आहोत. निवडीची प्रक्रिया तंतोतंत पाळत त्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्याकडे मोटार वाहन कायद्यासंदर्भात असलेली प्रकरणे निकालासाठी दिली जाणार आहेत. त्यामुळे त्यांना देखील न्यायदान करणे काहीसे सोपे होणार आहे. त्यांच्याबरोबर काही महाविद्यालयांतील, विधी विद्यालयांचे विद्यार्थी देखील लोकअदालतमध्ये सहभागी होणार आहेत.

तृतीयपंथींना समाजाच्या प्रवाहात सामावून घेणे. त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, तसेच सर्वांना समान हक्क मिळण्याचे संविधानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे, यासाठी तृतीयपंथींना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे शिक्षण आणि ते करत असलेले काम, या निकषांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

– सोनल पाटील, सचिव, विधी सेवा प्राधिकरण

हेही वाचा

Back to top button