पुणे : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची झाल्याने खुद्द शरद पवार यांनीच मंगळवारी (दि. 27) दिवसभर बारामतीतील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकांमध्ये त्या-त्या मतदारसंघांतील सध्याचे प्रश्न, अडचणी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात मंगळ-वारी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या बैठका सायंकाळी सातपर्यंत सुरू होत्या. या बैठकांना शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर, वेल्हे- भोर- मुळशी, इंदापूर, बारामती, दौंड, खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाला नवीन पक्षचिन्ह मिळाले. त्यापार्श्वभूमीवर जनमानसात पक्षचिन्ह आणि आपला पुरोगामी विचार पोहोचविण्याच्या सूचना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. तसेच, कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता काही पडद्यामागे घडलेल्या घटनांचा क्रम सांगितला. त्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा देखील घटनाक्रम कार्यकर्त्यांना सांगितला.
दरम्यान, पक्ष सोडून जाणार्या व्यक्ती विकासाचा मुद्दा समोर ठेवून दुसर्या पक्षात गेले नाहीत. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणेचा धाक दाखवल्याने पक्षप्रवेश झाले आहेत. आपल्याला कष्ट करावे लागतील. काळ कठीण आहे, पण आपण सगळे सोबत आहोत. महाराष्ट्रात आपले एका विचाराचे सरकार आणायचे आहे. त्यालाही तुमची साथ महत्त्वाची आहे. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणार्यांमध्ये तुमची खासदार असल्याचे सांगत अखेरच्या खडकवासला मतदारसंघाच्या बैठकीचा पवार यांनी समारोप केला.
राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्याने बैठकीच्या स्वागतासाठी
दोन व्यक्तींना तुतारी वाजविण्यासाठी उभे केले होते. या तुतारी वाजवणार्या व्यक्तींसोबत फोटो काढण्यासाठी दिवसभर येत असलेल्या कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू होती.
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. शरद पवार यांनी पुण्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सलग सहा बैठका घेतल्या. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या बैठका सलग नऊ तास शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू होत्या. शेवटची खडकवासाला मतदारसंघाची बैठक सायंकाळी सात वाजेपर्यंत चालली.
पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्या मंगळवारी झालेल्या आढावा बैठकांना किती प्रतिसाद मिळतो, याची सर्वांना उत्सुकता होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला वेळ दिली होती. त्या-त्या वेळेला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहाही मतदारसंघांतील बैठकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. बैठक व्यवस्थादेखील अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा