‘माय मराठी’चे काही खरे नाही; मायभूमीतच होतेय मातृभाषेकडे दुर्लक्ष

‘माय मराठी’चे  काही खरे नाही; मायभूमीतच होतेय मातृभाषेकडे दुर्लक्ष
पुणे : फसवणूक प्रकरणात त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.  न्यायालयाने आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच पासपोर्ट दोन महिन्यांसाठी तपास अधिकार्‍यांकडे जमा करण्याचा आदेश इंग्रजीतून दिला. त्याने निकाल गुगल ट्रान्सलेटरवर भाषांतरित करून समजलेल्या माहितीनुसार कागदपत्रे पोलिसांकडे जमा केली. सहा महिन्यांनंतर पासपोर्टची गरज असल्याने त्याने वकिलाकडे तो परत मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत विचारपूस केली. तेव्हा वकिलाने तो पासपोर्ट दोन महिन्यांसाठीच सुपूर्त करण्याचा आदेश असल्याचे सांगितले. इंग्रजी भाषेतील आदेश न समजल्याने पासपोर्टअभावी तो चार महिने बाहेरगावी जाऊ शकला नाही. परिणामी, त्याला कामावर पाणी सोडावे लागले. मराठी निकालाअभावी असे एक ना अनेक प्रकार न्यायालयात घडलेले दिसून येतात.
'शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये' असे म्हटले जाते. न्यायालयापासून सामान्य माणूस हा कायमच दूर राहण्याचा प्रयत्न करत आला आहे. मात्र, एखादा प्रसंग ओढावला अथवा घटना घडल्यानंतर त्याला न्यायालयाची पायरी चढावीच लागते. त्यातच न्यायालयीन कामकाज मुळातच सर्वसामान्य व्यक्तींना कळण्यास अवघड असते. त्यामुळे पक्षकारांना न्यायालयीन कामकाजाविषयी प्रत्येकवेळी वकिलांवर अवलंबून राहावे लागते. वकिलांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्यांना आपल्या खटल्याची माहिती घ्यावी लागते. ही सगळी अडचण लक्षात घेऊन, न्यायालयाची पायरी चढणार्‍या पक्षकारांना आपल्या संदर्भातील निकाल अधिक चांगल्या रितीने समजावा, यासाठी निकाल प्रादेशिक भाषांमध्ये देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. मात्र, प्रादेशिक भाषांमधून निकालांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
मराठी भाषा ही व्यवहाराबरोबरच न्यायाचीही भाषा व्हावी, या अपेक्षेने न्यायालयात येणार्‍या पक्षकारांसह वकीलवर्गाच्या पदरी अद्यापही निराशाच पडत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयात बहुतांश न्यायाधीशांमार्फत इंग्रजीतच निकाल देत असल्याने पक्षकार अद्यापही मराठी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायाधीश, वकील, न्यायालय हे न्यायासाठी कार्यरत असतात. परंतु, न्याय कोणासाठी असतो ? तो जनतेसाठी व सर्वसामान्य लोकांसाठी. परंतु, दिलेला व मिळालेला न्याय हा फक्त भाषेअभावी जर त्यांना समजलाच नाही तर न्याय मिळूनही अन्याय होतो, अशी भावना ज्येष्ठ वकिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या समस्यांना जावे लागते सामोरे

  • आदेशाची व्याख्याच समजत नसल्याने अर्थाचा अनर्थ होतो
  • अपील केल्यानंतर अंतिम टप्प्यात अपील व्यर्थ असल्याचे समजते
  • पक्षकारांसह वकील, न्यायालयाचाही वेळ होतो खर्च
  • आदेशाचे अवलोकन करण्यात बर्‍याचदा वकिलांचीही चूक
  • चुकीच्या सल्ल्याची पडताळणी करून निर्णय घेण्यात गोंधळ होतो
दक्षिणेतील कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत जिल्हा न्यायालयाचे आदेश हे तामिळ व कन्नड भाषेमध्ये दिसून येतात. त्यामुळे तेथील लोकांना ते अचूकपणे समजतात. दाव्यांच्या कामकाजासाठी गेल्यावर आमच्यासारख्या परप्रांतीय वकिलांनासुद्धा ते अगदी सहजपणे आदेश समजावून सांगतात. न्यायालयाच्या कामकाजात मात्र आजही मराठीचा वापर केवळ नावापुरताच आहे. किमान कनिष्ठ कोर्टात तरी मराठीतून निकाल देण्यात यावेत, असे निर्देश आहेत. मात्र, संपूर्ण निकाल मराठीतून देण्याचे प्रमाण
कमीच आहे.
– अ‍ॅड. अजिंक्य मधुकर मिरगळ, फौजदारी वकील.
न्यायालयीन आदेश हे सामान्य इंग्रजी भाषेत नसून, ते कायद्याच्या भाषेमध्ये असतात. ते सामान्य नागरिक आणि सुशिक्षित नागरिकांनासुद्धा समजणे अत्यंत अवघड होते. ज्याचे अवलोकन मराठीतून समजावणे फार कठीण होते. उच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकारने न्यायाधीशांनी निकाल मराठीत द्यावे, असे सांगितले आहे. मात्र, अद्यापही न्यायाधीशांमध्ये याबाबत अनास्था दिसून येत आहे.
     – अ‍ॅड. अमेय बलकवडे, फौजदारी वकील.

1998 साली काढली होती अधिसूचना

दिवाणी प्रक्रिया संहितेतील कलम 137 उपकलम दोननुसार राज्य सरकारला उच्च न्यायालयास दुय्यम असलेल्या कोणत्याही न्यायालयाची भाषा व लिपी ठरविण्याचा अधिकार आहे. तशीच तरतूद फौजदारी संहितेत कलम 272 मध्येही आहे. या अधिकारांचा वापर करून सरकारने 21 जुलै 1998 रोजी अधिसूचना काढून उच्च न्यायालयाला दुय्यम असलेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांची (काही प्रयोजने वगळता) भाषा मराठी असेल, असे घोषित केले. या अधिसूचनेला प्रदत्त कायद्याचे स्वरूप असून, ही अधिसूचना म्हणजे कायदाच आहे. प्रत्यक्षात जवळपास 25 वर्षांनंतरही राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांमध्ये पूर्णपणे मराठीत कामकाज चालत नाही आणि निकालपत्रेही मराठीत उपलब्ध केली जात नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयाचाही पुढाकार

इंग्रजी भाषेमुळे अडचण होत असलेल्या पक्षकार व सर्वसामान्य नागरिकांना उपयोग होईल, यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षी 'निवडक निर्णय' या शीर्षकाखाली तीन महत्त्वाची निकालपत्रे मराठीत भाषांतरीत स्वरूपात प्रसिद्ध केली होती. न्या. डी. एच. ठाकूर, न्या. कमल खाटा, न्या. अभय आहुजा, न्या. अजय गडकरी, न्या. प्रकाश नाईक यांचा समावेश असलेल्या तीन खंडपीठांची निकालपत्रे मराठीत प्रसिद्ध केली होती. या वेळी या निकालपत्रांचा उपयोग केवळ पक्षकारांना तो मातृभाषेत समजावा, यासाठी करावा. अन्य कोणत्याही कारणासाठी करण्यात येऊ नये. उच्च न्यायालयाच्या निकालपत्रांसाठी अधिकृत भाषा इंग्रजीच राहील, असेही स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news