Kurkumbh drug case : दबाव झुगारून तपास करा : अजित पवार

Kurkumbh drug case : दबाव झुगारून तपास करा : अजित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलिसांनी पकडलेल्या कोट्यवधींच्या ड्रग प्रकरणाशी राजकीय लागेबांधे असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप होत आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना राजकीय दबाव न घेता या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यासह कुरकुंभ, सांगलीतील कुपवाड व दिल्ली येथून 1 हजार 837 किलोचे एमडी जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रगची किंमत साडेतीन हजार कोटींवर आहे. एवढ्या प्रचंड प्रकरणात ड्रग शोधल्याने पुणे पोलिसांचे कौतुक आहे. खुद्द उपमुख्यमंत्री पवार व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये येऊन पुणे पोलिसांचे कौतुक केले होते. ड्रग प्रकरणाच्या मागील आणि पुढील धागेदोरे शोधण्याचे आदेश दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते.

असे असतानाच या प्रकरणाच्या तपासात काही राजकीय मंडळींकडून अडथळा आणला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत ही बाब आल्यानंतर त्यांनी शनिवारी पुणे दौर्‍यावर असताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना, तुमच्याकडून सुरू असलेल्या ड्रग प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे माझ्या कानावर आले आहे. मात्र, कोणाच्या दबावाला बळी न पडता तपास करा. तुमचा तपास उत्तमरीतीने चालू आहे, असे कौतुकही केले. दरम्यान, हजारो कोटींच्या या ड्रग प्रकरणात नक्की कोणाचे राजकीय लागेबांधे आहेत आणि पवारांचा निशाणा नक्की कोणाकडे होता, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

ललित पाटील प्रकरणातही आरोप

यापूर्वी ड्रगमाफिया ललित पाटील याचेही राजकीय कनेक्शन असल्याचे आरोप झाले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात अद्याप नक्की कोणत्या राजकीय नेत्याचे संबंध पाटील यांच्याशी होते, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news