घोरवडी धरणाने गाठला तळ : पाणी जपून वापरण्याचे आवाहन | पुढारी

घोरवडी धरणाने गाठला तळ : पाणी जपून वापरण्याचे आवाहन

सासवड : पुढारी वृत्तसेवा : सासवड शहराला पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या घोरवडी धरणात केवळ 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला आता गराडे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती पाटबंधारे अधिकारी विश्वास पवार यांनी दिली. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले आहे.

घोरवडी धरणावर दिवे प्रादेशिक योजना, सुपे-घोरवडी- पिंपळे-भोराळवाडी-भिवडी प्रादेशिक योजना, पूर पोखर प्रादेशिक योजना राबविली जाते. सध्या घोरवडी धरणाने तळ गाठला आहे, अशी माहिती सासवड नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी दिली. पुरंदर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याची व पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपली असून नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. जमिनीतील पाणीपातळी खालवली आहे. तालुक्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पिलानवाडी तलावातून शिवरी प्रादेशिक योजनेद्वारे शिवरीसह परिसरातील गावांना, तसेच 400 केव्ही सोसायटी, जेजुरीला पाणीपुरवठा केला जातो. या तलावात केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

– विश्वास पवार, शाखा अधिकारी, पाटबंधारे विभाग, गराडे.

हेही वाचा

Back to top button