पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेळ सायंकाळी चारची… महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ड्रगतस्करी प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने वकील अलर्ट मोडवर होते. अमली पदार्थविरोधी कायदा कलम 52 ए प्रमाणे कार्यवाहीसाठी गेलेले न्यायाधीश कधीही कोर्टात दाखल होतील अन् सुनावणीला सुरुवात होईल, या अपेक्षेने सर्वजण तयार होते. मात्र, ड्रग प्रकरणाची सुनावणी न्यायालयात नव्हे, तर पोलिस मुख्यालयातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तत्काळ सहायक सरकारी वकील, न्यायालयीन क्लार्क पोलिसांसह रिक्षातून मुख्यालयात दाखल झाले अन् प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या उपस्थितीत न्यायालयीन कार्यवाही सुरू झाली.
पुणे पोलिसांनी देशातील ड्रग रॅकेटची पाळेमुळे खोदल्यानंतर या प्रकरणात तब्बल 1800 किलो ड्रग जप्त करण्यात आले आहे. त्यातील पुण्यातील पकडण्यात आलेले 718 किलो ड्रग, तर सांगलीतील 148 किलो ड्रग पुण्यातील पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. ही प्रक्रिया प्रामुख्याने न्यायालयात पार पाडली जाते. परंतु, ड्रगचा साठा मोठा असल्याने ही प्रक्रिया थेट मुख्यालयात पार पाडली गेली. यामध्ये दिल्ली येथून जप्त करण्यात आलेले 970 किलो ड्रग अजून पुण्यात पोहोचायचे आहे. याला देखील मोठी जागा उपलब्ध करावी लागली असती. न्यायालयात ही प्रक्रिया पार पाडताना अडथळे निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यालयात या सर्व कार्यवाहीचे नियोजन करण्यात आले होते.
अमली पदार्थ पकडल्यानंतर अशी होते न्यायालयीन प्रक्रिया याबाबत एनडीपीएसचे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी सांगितले की, अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या मालाची जागेवरच पंचांसमक्ष मोजणी करण्यात येते. जप्त करण्यात आलेल्या मालाच्या मोजणीनंतर संबंधित अमली पदार्थ न्यायाधीशांसमोर सादर करावा लागतो. त्यासाठी काही नमुन्यांच्या स्वरूपात ते न्यायालयासमोर दाखल करण्यात येते.
या वेळी नमुन्यावर लेबल लावून ते सील करीत केमिकल अॅनालिसिससाठी पाठविण्यात येते. मात्र, एखाद्या व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात येऊ नये, या उद्देशाने जप्त केलेला माल हा अमली पदार्थच आहे, याची खातरजमा करण्यासाठी ही कायदेशीर प्रक्रिया राबविली जाते. केमिकल अॅनालिसिसकडून मिळालेला अहवाल हा या गुन्ह्यात प्राथमिक पुरावा समजला जातो. यादरम्यान, संबंधित जप्त माल हा पोलिसांकडे जमा करण्यात येतो. पर्यायी न्यायालयाच्या आदेशाने हा माल नष्ट देखील करण्यात येतो.
ड्रगतस्करी प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यासह कुरकुंभ, सांगलीतील कुपवाड येथून जप्त केलेल्या व बाजारात हजारो कोटींची किंमत असलेले ड्रग शिवाजीनगर मुख्यालयात ठेवण्यात आले आहे. 29 पोती तसेच 50 हून अधिक पाकिटांमध्ये 867 किलो ड्रगचे नमुने घेण्याचे काम सध्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. तर, रात्री उशिरा दिल्लीतून पकडलेले ड्रग पुण्यात दाखल होणार होते.
हेही वाचा