पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ येथील कारखान्यातून शेकडो किलो ड्रगची तस्करी दिल्लीला होत होती. तेथून हे ड्रग नेपाळमार्गे परदेशात पाठविले जात होते. या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या दिल्लीतील चौघांना पुणे पोलिसांनी दिल्लीत जाऊन बेड्या ठोकल्या. त्यांना शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपींना जरी विमानाने पुण्यात आणले असले, तरी दिल्लीतून जप्त करण्यात आलेले 970 किलो ड्रग चोख सुरक्षाव्यवस्थेत रस्तामार्गाने पुण्यात आणले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमली पदार्थतस्करी प्रकरणात दिल्लीतून अटक केलेले आरोपी संदीप राजपाल कुमार (वय 39), दिव्येश चरणजित भुतानी (वय 38), संदीप हनुमानसिंह यादव (वय 32) आणि देवेंद्र रामफुल यादव (वय 32, सर्व रा. नवी दिल्ली) यांना न्यायालयाने 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली आहे, तर सात आरोपींचा पोलिसांना शोध आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी व आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या ड्रगची पाहणी करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात आले होते.
ड्रगतस्करी प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यासह कुरकुंभ, सांगलीतील कुपवाड व दिल्ली येथून एकूण 1837 किलो एमडी जप्त केले असून, त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 3 हजार 579 कोटी एवढी आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, अमली पदार्थांमुळे पुढील पिढ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आरोपींनी अन्य शहरांत एमडीचा साठा लपवून ठेवला आहे का, त्यांनी आणखी कोणाला अमली पदार्थ दिले, त्याची वाहतूक कशी केली, त्यांना आर्थिक मदत कोणी केली, याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी राजेंद्र लांडगे व सहायक सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केली.
त्यावर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. रोहित यादव यांनी, आरोपी तीन दिवस दिल्ली पोलिसांच्या कोठडीत होते. त्यांच्या कार्यालय व घरातून अमली पदार्थ जप्त झालेले नाहीत. त्यामुळे पोलिस कोठडीत चौकशीची गरज नाही, असा केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी पुण्यातून 718 किलो, तर सांगलीतून 148 किलो, असे तब्बल 1400 कोटींचे ड्रग जप्त करण्यात आले आहे. तर, दिल्लीतून जप्त केलेले ड्रग पुण्यात आणले जात आहे.
ड्रगतस्करी प्रकरणात निर्माते व तस्कर हे प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे तरुणाई उद्ध्वस्त होऊन तो देशासाठी वाईट दिवस असेल. त्यामुळे हा देशविरोधातील गुन्हा आहे. ड्रगनिर्मिती व तस्करीच्या गुन्ह्याचे धागेदोरे सोमवार पेठेतून थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. दररोज मेफेड्रॉनचा नवीन साठा हस्तगत होत असून, मोठे जाळे उघडकीस येत आहे. त्यामुळे अवघ्या चार ते पाच दिवसांत केस डायरी पाचशे पानांच्या पुढे गेली असून, ही चिंताजनक बाब असल्याचे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.
हेही वाचा