घोटाळ्यांची पाळेमुळे खोदून काढणारे अधिकारी किसन भुजबळ यांचे निधन | पुढारी

घोटाळ्यांची पाळेमुळे खोदून काढणारे अधिकारी किसन भुजबळ यांचे निधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागातील अनेक मोठ्या घोटाळ्यांची पाळेमुळे खोदून काढून ‘तपास अधिकारी’ म्हणून नाव झालेल्या जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ (वय ५५, रा. चंदननगर, पुणे) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण विभागात शोककळा पसरली आहे.

जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात एक निर्भिड, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जिल्ह्यात भुजबळ यांचा दबदबा होता. अनधिकृत शाळा शोधून त्यांच्यावर कडक कारवाईची अंमलबजावणी करत असत. विविध तालुक्यात त्यांनी गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार सांभाळला. अनधिकृत शाळांवर कारवाई करताना कुठलाही राजकीय, प्रशासकीय दबाव न घेणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षण विभागाबाबत आलेल्या तक्रारीवर भुजबळ तपासणी अधिकारी असेल तर हमाखास कारावाई होणार अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील बड्या घोटाळ्यांच्या तपासात त्यांची ईडीने साक्ष नोंदवून घेतली होती, तर त्यांना पोलिस संरक्षण देखील घेण्याची वेळ होती.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे तालुक्यातील कासारी येथील मुळ गावचे रहिवासी होते. भुजबळ यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. शुक्रवारी रात्री अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. किसन भुजबळ यांनी पुणे, हवेली, भोर, जुन्नर, दौंड तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले. सध्या ते मुळशी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत होते.

हेही वाचा

Back to top button