धक्कादायक ! बोगस बचत गटाद्वारे चालविले रेशनिंग दुकान | पुढारी

धक्कादायक ! बोगस बचत गटाद्वारे चालविले रेशनिंग दुकान

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : स्थानिक बचत गटाला रेशनिंग दुकान चालू करण्यामध्ये प्राधान्य असताना वाणेवाडी (ता. बारामती) येथे महसूल व पुरवठा विभागाच्या वरदहस्ताने एक बोगस बचत गट तब्बल सहा वर्षे रेशनिंग दुकान चालवत होते. ग्रामस्थांच्या आक्षेपानंतर हे दुकान तात्पुरते बंद करण्यात आले. मात्र, आता किरकोळ कारवाई करून पुन्हा रेशनिंग दुकान सुरू करण्यास परवानगी दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. याबाबत ग्रामस्थ स्वप्निल चांदगुडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देत संबंधित बचत गटाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाणेवाडीत मागील सहा वर्षांपासून समृद्धी महिला बचत गटाअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदार अमोल वाईकर हे दुकान चालवीत होते. वाईकर हे बारामती येथील रहिवासी आहेत.

ज्या समृद्धी महिला बचत गटाअंतर्गत दुकान चालविले जाते तो गटच बोगस आहे. त्यांनी स्वस्त धान्य दुकानाचा परवाना घेताना बोगस कागदपत्रे शासनास सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाणेवाडी गावामध्ये 150 पेक्षा जास्त महिला बचत गट कार्यरत असतानाही दुसर्‍या गावातील वाईकर हे तालुक्यात चार स्वस्त धान्य दुकाने वेगवेगळ्या ठिकाणी चालवीत असून, वाणेवाडीसह अन्य तीन दुकानांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. समृद्धी गटाच्या कागदोपत्री अध्यक्षा शकुंतला बहीरमल असून, सोमेश्वरनगर येथील जिल्हा बँकेत समृद्धी बचत गटाचे असलेल्या खात्याला मात्र सुजाता बहीरमल या अध्यक्षा दिसत आहेत.

या गटाबाबत आक्षेप घेतल्यानंतर मंडलाधिकार्‍यांनी तपासणी करीत दुकानावर ताशेरे ओढले. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी त्या गटाची अनामत रक्कम जप्त केली. मात्र, गटाच्या वतीने दुकान पुन्हा सुरू करण्यास धक्कादायकरीत्या परवानगी दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. समृद्धी महिला बचत गटाचे सर्व सदस्य, दुकानचालक, बोगस कागदपत्रे देणारे महसूलचे अधिकारी व करंजेचे तलाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्वप्निल चांदगुडे यांनी केली आहे.

आमची सगळी कागदपत्रे योग्य असल्यामुळेच आम्हाला दुकानाचा परवाना मिळाला आहे. अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिला होता. मात्र, पुन्हा दुकान सुरू करण्यास त्यांनी परवानगी दिली. कुठलीही कागदपत्रे बोगस नाहीत.

अमोल वायकर, रेशन दुकानाचे चालक

हेही वाचा

Back to top button