जलजीवन योजनेची चौकशी करा : खासदार सुप्रिया सुळे

जलजीवन योजनेची चौकशी करा : खासदार सुप्रिया सुळे
Published on
Updated on

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकारबद्दल दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, या मिशनच्या जिल्ह्यातील सर्वच कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांकडे हा विषय उपस्थित करून आपण याची संपूर्ण चौकशी करणारच, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. केडगाव (ता. दौंड) येथे दै. 'पुढारी प्रतिनिधी'शी त्या बोलत होत्या.

या वेळी जलजीवन मिशन योजनेच्या दै. 'पुढारी'त प्रसिद्ध झालेली वृत्तमालिका त्यांना दाखविण्यात आली. दौंड तालुक्यात 56 गावांसाठी 300हून अधिक कोटींची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून दौंड पंचायत समितीच्या उपविभागीय पाणीपुरवठा विभाग गेली वर्षभर करीत आहे. या योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत संपूनही त्या पूर्ण झालेल्या नाहीत तसेच या योजनांमध्ये अनेक झोल झाले आहेत. यामध्ये उद्भव नसताना झालेल्या योजना, एकाच ठेकेदाराला आठ योजनांचा दिलेला ठेका, अशा छोट्या-मोठ्या विविध गोंधळांची वृत्तमालिका सुरू असताना खा. सुळे यांच्या कानावर हा विषय घातला असता सुळे यांनी याची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देताना त्या म्हणाल्या, केंद्र सरकारकडून गावाच्या लोकांच्या कल्याणासाठी निधी आणला जातो. या निधीमधून अशी कामे झाली असतील, तर याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.

दौंड तालुक्यातील पंचायत समितीची पाणीपुरवठा विभाग, पुणे जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग यातील वरिष्ठ मात्र एवढे गैरप्रकार उघड होऊनही कोणतीही चौकशी न करता हातावर हात ठेवून ठेकेदार आणि अधिकारी यांना पाठीशी घालत बसला आहे. अधिकारी आपले फोन बंद करून शांत बसतात, तर काही आम्ही बैठकीत आहोत नंतर फोन करू, अशी बतावणी करून फोन घेण्याचे टाळतात. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने दौंड तालुक्यामध्ये मात्र पिण्याच्या पाण्यावर होणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पुरता बट्ट्याबोळ झालेला आहे. खा. सुप्रिया सुळे यांनीच या प्रकाराची दखल घेतल्याने आता याबाबत न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्याच्या योजनांमध्ये झालेल्या गडबड घोटाळ्याचे आता खरे स्वरूप चौकशीअंती बाहेर येणारच, अशा स्वरूपाची आशा निर्माण झाली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news