स्थापना माझी, पक्ष आणि चिन्ह मात्र दुसर्‍याला; हा सत्तेचा गैरवापर : शरद पवार | पुढारी

स्थापना माझी, पक्ष आणि चिन्ह मात्र दुसर्‍याला; हा सत्तेचा गैरवापर : शरद पवार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पक्षाची स्थापना मी केली आणि पक्ष व चिन्ह मात्र दुसर्‍या गटाला दिले, हा सत्तेचा गैरवापर आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. सर्वेक्षणात इंडिया आघाडीला निम्म्या जागा मिळतील, असे सांगितले जाते. यामुळे फोडाफोडी सुरू आहे, त्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्था वापरत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

मला सगळे सोडून गेल्याची चिंता नाही. 1980 मध्ये माझ्याकडे 59 आमदार होते. मी परदेशातून फिरून आल्यावर फक्त 5 आमदार शिल्लक राहिले. जे सोडून गेले, त्यातील 95 टक्के पुढील निवडणुकीत पराभूत झाले. इतिहासाची पुनरावृत्ती नेहमीच होईल, असा इशारा पवार यांनी अजित पवार गटाला दिला. चंदीगड महापौर निवडणुकीत बेकायदेशीर कृत्य झाले होते. सत्तेचा गैरवापर कसा करतात याचे उत्तम उदाहरण आहे. आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने सत्ता घेत आहेत आणि ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ म्हणत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. श्वेतपत्रिकेत ‘आदर्श’चे नाव आले. यामुळे अशोक चव्हाण गेले याचे आश्चर्य वाटले नाही, असेही त्यांनी सांगितले.

सरकारची शेतकर्‍यांसाठी न्यायाची भूमिका नाही. त्यांची धरसोडवृत्ती शेती अर्थव्यवस्थेला घातक आहे, असे सांगत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीच्या सीमेवर एक वर्षाहून अधिक काळ शेतकर्‍यांचे आंदोलन झाले. कांदा उत्पादक फार मोठा बागायतदार नसतो. त्यांनी काही करार केले आहेत. यामुळे निर्यातबंदीची गरज नव्हती, असेही पवार यांनी सांगितले.

जागावाटपाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेचा फायदा होईल. आमच्या भेटीत लोकसभा लढवण्याबाबत शाहू महाराज यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. बारामतीत विरोधकांनी नाव अद्याप जाहीर केलेले नाही, असेही पवार यांनी सांगितले.

पक्षांतरबंदी कायदा सक्षम व्हावा, यासाठी आयोगाला पत्र दिले आहे. सोशल मीडिया, न्यूज चॅनल्सवर विरोधात काही दाखवले, तर बंदी घालून व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करताना गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती घ्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार आदी उपस्थित होते.

Back to top button