Kurkumbh Drugs Case : कुरकुंभच्या ड्रग्जला लंडनची बाजारपेठ | पुढारी

Kurkumbh Drugs Case : कुरकुंभच्या ड्रग्जला लंडनची बाजारपेठ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कुरकुंभ येथील कारखान्यात तयार होणार्‍या ड्रग्जला (मेफेड्रॉन) लंडनची बाजारपेठ मिळाली असल्याची पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्जतस्करीचे लंडन कनेक्शन उघड केले आहे. आतापर्यंत पुण्यातून 1400 कोटींचे 718 किलो, दिल्ली येथून 1900 कोटींचे 970 किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. असे सर्व मिळून पोलिसांनी तब्बल साडेतीन हजार कोटींहून अधिक किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले आहे.
वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (40, सोमवार पेठ, खडीचे मैदान, सोमवार पेठ),  अजय अमरनाथ करोसिया (35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), अनिल उर्फ भीमाजी परशुराम साबळे (46, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज
बब्रुवान भुजबळ (41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर, दिल्ली येथून दिवेश भुतिया (39) आणि संदीप कुमार (42, दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले असून, दोघांनाही ट्रान्झीट रिमांडद्वारे पुण्यातील न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात  येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मेफेड्रॉन जप्त केल्यानंतर विश्रांतवाडी येथून मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन जप्त केले. याचाच पुढे तपास करत असताना पोलिसांना कुरकुंभ येथील भीमाजी साबळे याच्या अर्थकेम लॅबरोटरीज या कारखान्याविषयी माहिती मिळाली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मेफेड्रॉनचे उत्पादन होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी येथून तब्बल 683 किलो मेफेड्रॉन जप्त केले. या कारखान्यातून देशातील अन्य ठिकाणीही या ड्रग्जचा पुरवठा झाल्याने त्याअनुषंगाने तपास केला असता, त्यामध्ये दिल्ली कनेक्शन उघड झाले. दिल्लीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून पुणे पोलिसांनी तब्बल 970 किलो मेफेड्रॉन जप्त केले. या वेळी दिवेश भुतिया आणि संदीप कुमार यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना त्यांच्याकडे ड्रग्जचा साठा सापडला आहे.
आयुब अकबर मकानदार याने सांगलीतील कुपवाड औद्योगिक वसाहतीत असलेल्या खोलीत मेफेड्रॉनचा साठा करून ठेवला होता. गुन्हे शाखेला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट सांगलीत दस्तक देत ही कारवाई केली. हैदरने ज्याप्रमाणे मिठाच्या पोत्यात एमडी लपवून ठेवले होते, त्याचप्रमाणे आयुबने देखील साठा केला होता. त्याच्याकडून आत्तापर्यंत अकरा किलोच्या अकरा पिशव्या, तर एक-एक किलोच्या 39 पिशव्या मिळून आल्या आहेत. आयुब हा अमली पदार्थाच्या गुन्ह्यात आठ वर्षे येरवडा कारागृहात बंद होता. बाहेर आल्यानंतर त्याने परत हा उद्योग सुरू केल्याचे दिसून आले आहे.

पुणे-दिल्ली व्हाया लंडन

दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आलेल्या दिवेश भुतिया आणि संदीप कुमार यांची कुरिअर कंपनी आहे. तसेच त्यांची दिल्लीत गोदामे आहेत. दोघांनी अन्नपुरवठा करण्याच्या नावाखाली विमानाद्वारे लंडनला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिल्लीत टेम्पोद्वारे तस्करी

कुरकुंभ येथील कारखान्यातील माल दिल्ली येथे पोहोचविण्यासाठी साध्या टेम्पोचा वापर करण्यात आला आहे. रस्ते मार्गाने ड्रग्जची तस्करी झाली असून, आरोपींनी त्यांच्या कुरिअर कंपनीचा वापर यासाठी केला. दिल्लीला पोहोचलेले ड्रग्ज हे बॅरेलद्वारे पोहोचविण्यात आलेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा संशय

ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले असताना दुसरीकडे याचा हवालाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, याचे अंडरवर्ल्डशी संबंध तर नाहीत ना, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कंपनीत अशी राखली गुप्तता

कुरकुंभ येथील साबळेच्या कंपनीत तीन प्रकारचे कम्पोनंट तयार होत होते. या ठिकाणी मेफ—ेड्रॉनची निर्मिती होत असल्याची चाहूल कोणालाही न लागण्यासाठी कंपनीतील हालचाली सामान्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ड्रग्जचा पुरवठा करताना त्यासाठी विशेष  कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे कुणालाही याचा संशय आला नाही. दरम्यान, गुन्हे शाखेची पथके अधिक तपासासाठी विविध राज्यात रवाना झाली आहेत.

विमानतळावरील कडक सुरक्षा भेदली

मेफेड्रॉनची लंडनला ड्रग्जची तस्करी झाली असल्याची माहिती समोर आल्यानंतर हे ड्रग्ज विमानानेच लंडनला पोहोचल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. मात्र, विमानतळावर उच्च दर्जाची सुरक्षाव्यवस्था व यंत्रे असतानाही सुरक्षा यंत्रणेच्या नजरेत लंडनला पुरवठा झालेले ड्रग्ज कसे आले नाही, असादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून एफडीए, एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार

प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाबरोबर पोलिसांनी कुरकुंभ येथील मेफेड्रॉननिर्मिती करणार्‍या अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार केला आहे. कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांनी या पत्रात केल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि. 20) पहाटे पोलिसांनी कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीत कारवाई केली. तेव्हा हा प्रकार समोर आला.
इतर केमिकल उत्पादनांच्या नावाखाली येथे अमली पदार्थ तयार करण्याचा उद्योग सुरू होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत दोन कंपन्यांत अमली पदार्थ तयार केले जात असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर देखील औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एफडीए यांच्या हा प्रकार निदर्शनास कसा आला नाही? हा देखील एक मोठा सवाल आहे. पोलिसांनी अर्थकेम लॅबोरेटरीज ही कंपनी सील केली असून, या तिन्ही विभागांना तेथे कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सांगलीतून 145 किलो मेफेड्रॉन जप्त

कुरकुंभ येथील कंपनीतून सांगली येथील एका गोदामातून 290 कोटी रुपयांचे 145 किलो ड्रग्ज पुणे पोलिसांनी पकडले आहे. या वेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. नेमके हे ड्रग्ज सांगलीतच पुरविले जाणार होते, की  बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये, की दिल्लीला पुरवठा केले जाणार होते, याचा तपास आता पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
ड्रग्जचा साठा देशाच्या बाहेर जात होता. सांगलीतही पोलिस पथकांनी छापेमारी केली. तेथूनही ड्रग्ज जप्त करण्यात आले. आठ आरोपी ताब्यात घेण्यात आले. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 1700 किलो ड्रग्ज आतापर्यंत जप्त करण्यात आले. त्याची 3 हजार कोटींहून अधिक किंमत आहे. त्याबरोबरच लंडला ड्रग्जची तस्करी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे  

हेही वाचा 

Back to top button