आळेफाटा उपबाजारात कांदादरात वाढ : दहा किलोस 280 रुपये कमाल दर

आळेफाटा उपबाजारात कांदादरात वाढ : दहा किलोस 280 रुपये कमाल दर

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्यानंतर कांदादरात वाढ होऊ लागली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातही मंगळवारी (दि. 20) झालेल्या लिलावात कांदादरात जवळपास 40 ते 45 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. प्रतिदहा किलोस 280 रुपये कमाल दर मिळाल्याची माहिती सभापती संजय काळे आणि संचालक प्रीतम काळे यांनी दिली.
केंद्र सरकारने बाजारपेठांमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी कांदा निर्यातबंदी केली होती.

त्या वेळी कांद्याचे दर घसरल्याने आळेफाटा उपबाजारात शेतकर्‍यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर आजपर्यंत कांदादर घसरलेलेच होते. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. आता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठविल्यामुळे कांदादरात वाढ होऊ लागली आहे. आळेफाटा उपबाजारात मंगळवारी झालेल्या लिलावात दरात वाढ झाल्याचे दिसून आले. सध्या ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांत लागवड झालेल्या लाल रांगड्या कांद्याची काढणी सुरू आहे. यामुळे या काद्यांची सध्या आवक होत आहे. पुढील महिन्यात रब्बी हंगामात लागवडी झालेल्या कांद्याच्या काढणीस सुरुवात होणार आहे. मंगळवारी झालेल्या लिलावात 8 हजार 700 गोणी कांदा शेतकर्‍यांनी लिलावात विक्रीस आणल्याची माहिती सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.

कांद्याला मिळालेला दर (प्रतिदहा किलोनुसार)

  • सुपर गोळा कांदा : 260 ते 280 रुपये
  • सुपर मध्यम कांदा : 240 ते 261 रुपये
  • गोल्टी व गोल्टा कांदा : 200 ते 230 रुपये
  • बदला कांदा व चिंगळी कांदा : 100 ते 170 रुपये

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news