मराठ्यांचा विश्वासघात! आज जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार | पुढारी

मराठ्यांचा विश्वासघात! आज जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार

जालना; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत केले असले तरी, मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे आणि सगेसोयरे आरक्षणाची अंमलबजावणी करा, या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. मराठ्यांचा सरळ सरळ विश्वासघात केला असल्याचे मत या निर्णयावर त्यांनी व्यक्त केले. त्यांनी हाताला असलेले सलाईनही काढून टाकले असून उपचार थांबविले आहेत. दरम्यान, त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (21 फेब्रुवारी) अंतरवालीत निर्णायक बैठक बोलावली आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

जरांगे म्हणाले, मराठा समाजाला शिक्षण व नोकर्‍यांत 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर झाल्यानंतर जरांगे म्हणाले, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवे आहे. आम्ही ते मिळवणारच. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र ते न्यायालयात टिकेल का, हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळेच आमच्या हक्काचे ओबीसीतून मिळाले पाहिजे. प्रत्येकवेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचे वाटोळे होऊ देणार नाही. ही आडमुठी भूमिका नाही. सरकारला समाजाने सहा महिने वेळ दिला. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरल्यावर राजकीय पक्षांना मराठ्यांची गरज समजेल. निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या भविष्याचे पाहिले, आमच्या लेकरांच्या भविष्याचे आम्ही बघू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

वेगळ्या आरक्षणाचा लाभ 150 ते 200 मराठ्यांनाच

जरांगे म्हणाले, विधिमंडळात आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी त्याचा बहुतांश मराठा समाजाला कोणताही फायदा होणार नाही. सगेसोयरे हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मराठा समाज लढा देत आला आहे. आता नव्याने मिळालेल्या स्वतंत्र आरक्षणाचा फायदा केवळ 150 ते 200 मराठ्यांनाच मिळणार आहे. हे आम्हाला मान्य नाही.

संबंधित बातम्या

स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण नुकसान करणारे

दोन-तीन लोकांना मराठा समाजाचे नुकसान करायचे, असा आरोप करून ते म्हणाले, यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले, तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या. नियुक्त्या मात्र झाल्या नाहीत. त्यांचे नोकरीचे वय निघून जात आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सग्यासोयर्‍याचे आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की, सहा कोटी मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Back to top button