Eknath Shinde : रायगडच्या धर्तीवर शिवनेरीचा विकास : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

Eknath Shinde : रायगडच्या धर्तीवर शिवनेरीचा विकास : मुख्यमंत्री शिंदे

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले हा आपला ठेवा आहे. तो जपण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात किल्ले रायगडच्या धर्तीवर शिवजन्मभूमी शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. (Eknath Shinde)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले  जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी पंतप्रधानांनी शिफारस केली. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर येथील सुकाळवेढे, बोरघर, डुचकेवाडी, खेतेपठारमार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी 83 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. किल्ले संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. (Eknath Shinde)

एएसआयचे नियम शिथिलीसाठी केंद्र सकारात्मक : फडणवीस

किल्ल्यांचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणार्‍या अडचणीबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये पुरातत्त्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सोपी करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. पद्धत सोपी झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले म्हणून जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (Eknath Shinde)

मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. राष्ट्रगीत तसेच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची धून पोलिस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. पोलिस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगील युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त बि—गेडिअर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ. अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला.

Back to top button