निर्यात बंदी शिथील झाल्याने कांदा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग | पुढारी

निर्यात बंदी शिथील झाल्याने कांदा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

राजगुरुनगर पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी शिथील केल्यानंतर शेतातील कांदे बाजारात नेण्यासाठी खेड तालुक्यातील उत्पादक शेतक-यांची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, निर्यात बंदी असताना दहा ते बारा रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत होता. त्यात वाढ होऊन हा भाव वीस ते बावीस रुपयांपर्यंत मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

खेड तालुक्यात रब्बी हंगामात शेतकरी मोठया प्रमाणात कांदा पीक घेतात. तालुक्यात भिमा-भामा नदी तसेच नदीपात्रातील बंधारे आणि चास कमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर आधारीत बागायती क्षेत्र वाढले आहे.जवळपास दहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.गेले महिनाभर कांद्याची काढणी झाली. मात्र बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी काढणी झालेला कांदा शेतात अरणी करून साठवला होता.

केंद्र सरकारने शनिवारी (दि. १७) निर्यात बंदी शिथील केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी चाकण, मंचर बाजार समितीच्या आवारात कांद्याला दुप्पट भाव मिळाला. बाजाराचा अंदाज आल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी मजूर घेऊन कांदा निवड करून पिशव्या भरल्या. ट्रॅक्टर, पीक अप, ट्रॅक आदींच्या माध्यमातून हा कांदा बाजारात नेण्यासाठी लगबग केली. अनेक शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागला. पुढचे काही दिवस बाजार भाव वाढण्याची शक्यता असल्याने काही शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत.

लागवडीनंतर ढगाळ वातावरण, धुके यामुळे कांद्यावर अनेकदा करप्याचा प्रादुर्भाव झाला. औषध फवारणी करावी लागली. मात्र तरीही उत्पन्नात अर्धाअधिक फरक पडला. हातात आलेला कांदा आणि पडलेला बाजारभाव यामुळे शेतकरी हतबल झाला होता. निर्यात बंदी उठल्याने शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होईल असे तुकईवाडी, भांबुरवाडी तसेच पानमळा (सांडभोरवाडी) येथील रोहिदास दरेकर,करण सांडभोर, एकनाथ वरकड, कुंडलिक थिगळे, पिंटू उर्फ प्रदीप वाळुंज या शेतकऱ्यांनी सांगितले.

Back to top button