बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्या मृत्युमुखी किवळे येथील घटना | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात 10 शेळ्या मृत्युमुखी किवळे येथील घटना

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील किवळे गावच्या लिंबळेवस्ती येथे शनिवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास घराचे समोरील कुंपणातील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये 10 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेने संपूर्ण किवळे गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली. किवळे येथील शेतकरी लक्ष्मण विठोबा लिंबळे यांच्या घरासमोरील कुंपणात शेळ्या बांधल्या होत्या. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने कुंपणात शिरून शेळ्यावर हल्ला चढवला.

यामध्ये सात मृत शेळ्यांचे जागीच अवशेष मिळून आले व तीन शेळ्यांचे अवशेष मिळून आले नाहीत. घटना समजताच वन विभागाचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, तसेच गावकर्‍यांना बिबट तसेच अन्य वन्य प्राण्यांपासून सावधानता बाळगण्याच्या सूचना केल्या. बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात राजगुरुनगर व चाकण वन विभाग कुचकामी ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी लक्ष्मण लिंबळे यांनी शासनाच्या वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी व तत्काळ बिबट्याला पकडावे, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button