Success Story : व्यंगावर मात करत तिने केली दिव्य कामगिरी : स्नेहाचा थक्क करणारा प्रवास | पुढारी

Success Story : व्यंगावर मात करत तिने केली दिव्य कामगिरी : स्नेहाचा थक्क करणारा प्रवास

लखन शोभा बाळकृष्ण

यश मिळवायचं असेल तर जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रींचा योग्य वापर करणे गरजेचे असते. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काय आहे यावर काम केलं तर तुम्ही स्पर्धेच्या युगात तुमचं अढळ स्थान निर्माण करू शकता.. ऐकण्याची शक्ती पन्नास टक्केच असल्याचे शारीरिक न्यूनत्व मागे सारत विश्रांतवाडीच्या स्नेहा सरोज राजाराम गायकवाड या मुलीने महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयातील वर्ग ब (Class 2) अराजपत्रित पदांमधील राज्य कर निरीक्षक पदाला( STI) गवसणी घातली. विविध पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(Mpsc) दरवर्षी “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा” आयोजित केली जाते.

स्नेहा ही मूळची मराठवाड्यातल्या उमरगा तालुक्यातील वागदरीची. वडिल इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरूस्तीचा व्यवसाय करण्यास पुण्यातल्या विश्रांतवाडीत आले. आई गृहिणी आहे. Hearing Impairement Problem मुळे तिला नैसर्गिक क्षमतेपेक्षा 50 टक्के कमी ऐकायला येतं.  कुटूंबातील सदस्यांच्या रोज बोलण्याच्या सवयीतून तिला घरी संवाद साधायला सोपं जात असलं तरी अनोळखी व्यक्ती बोलत असेल तर मात्र तिला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा या अवघड परिस्थितीमध्ये तिने हे यश खेचून आणलं हे कौतुकास्पद आहे.

स्नेहाच्या आयुष्यात तिची खरी परीक्षा सुरु झाली ती म्हणजे इयत्ता दहावीनंतर तिने जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा. तिला जेव्हा हे कळू लागलं की आपण स्वतःला आहे तसं स्वीकारु शकत नाही. तेव्हा ती तणावाखाली आली. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीचा आलेख खाली आला.  काही लोकांना तिच्याबद्दल वाटणारी सहानुभूती तिच्या जीवावर उठत होती. यात तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तो पुरता नकारात्मक होत गेला. शाळेत पहिला क्रमांक मिळविणारी स्नेहा सुरू असलेलं चांगलं शिक्षण थांबवायचं या निर्णयापर्यंत येऊन पोहचली. तणावामधील तिची अवस्था पाहून वडिलांच्या डोळ्यात तिने पाणी बघितलं आणि तोच तिचा टर्निंग पॉईंट ठरला. आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात? याचा विचार आपण करायचा नाही. त्यादृष्टीने ती परत आपल्या अभ्यासाकडे वळली.

कॉलेजमध्ये प्रवेशावेळी तिच्या क्षमतेवर शंका..

जेव्हा स्वतःला आहे तसं स्वीकारलं तेव्हा गोष्टी तिच्या बाजूला झुकू लागल्या. तिथून पुढे तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. मानसिक त्रास होताच, नैसर्गिक क्षमतेपेक्षा 50 टक्के कमी (Hearing Impairement Problem) मुळे बऱ्याच अडचणी आल्या. स्नेहाने विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मॉडर्न कॉलेजातून विशेष प्राविण्यासह पूर्ण केलं. ज्या प्राध्यापिकेने प्रवेशावेळी तिच्या क्षमतेवर शंका घेतली होती, त्यांनीच स्नेहाचा पदवीचा अंतिम निकाल बघून मात्र सर्व वर्गासमोर तिच्या क्षमतेवर मोठी शाब्बासकी दिली होती.

ती सांगते हा प्रवास सोपा नव्हता, वडील एकहाती पाच जण असणारं कुटुंब चालवत होते. स्नेहा आणि तिचे दोन बहीण भाऊ यांचं शिक्षणही सुरूच होतं. पदव्युत्तरला शिक्षण घेत असताना तिची कँम्पस इंटरव्ह्युमधून आयटी कंपनीमध्ये निवड झाली होती. पण तिने सहा महिन्यांपर्यंत जॉब केला. प्रशासनात यायचं स्वप्न म्हणून जॉब सोडला. त्यानंतर चार महिन्यांनी लॉकडाऊन सुरू झालं, कुटूंबाला तेव्हा आर्थिक परिस्थितीच्या झळा सोसाव्या लागल्या, आजूबाजूला जीव जात होते. मन अस्वस्थ होत होतं. आईवडील सोडून इतर सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं, हातातला जॉब सोडला आता काय करणार?? पण स्नेहाचे आई-वडीलांनी मात्र तिच्या निर्णयाला समर्थन दिलं.

व्यंगावर मात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि आई वडिलांची भक्कम साथ..

निसर्गतःच आलेलं शारीरिक व्यंग आणि त्या व्यंगावर मात करत तिने या यशाला आपलंसं केलं आहे. तिच्या यशाचे जे साक्षीदार आहेत त्यात प्रथम तिचे आईवडील येतात. ती या यशाचं श्रेय आपल्या आईवडिलांना देताना सांगते की ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने मी हे स्वप्न पाहिलं आणि आईवडिलांच्या मदतीने मी ते स्वप्न पूर्ण केलं.’ परिस्थितीशी झगडत आईवडिलांनी तिला उच्च शिक्षण दिलं. “घरात लग्नाची तरणी पोरगी झाली, लग्न करून टाका. कधीपर्यंत शिक्षण कराल?” असे टोमणे समाजातून आईवडिलांच्या दिशेने ऐकू येत असतानाही आई वडिलांनी स्नेहाच्या अभ्यासामध्ये कसलाही खंड पडू दिला नाही. त्यांचं पाठबळ तिला वेळोवेळी मिळत गेलं. या पाठबळामुळे अभ्यासासाठी मिळालेलं स्वातंत्र्य तिने पुरेपूर उपभोगलं आणि त्याचा परिपाक हा तिच्या यशात झाला. असं ती आवर्जून नोंदवते.

स्नेहाला आपल्या या राज्य कर निरीक्षक सेवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षितांकडून अपेक्षित असलेलं काम समाजासाठी करायचं आहे. ती म्हणते की ‘परीक्षा पास होणं माझ्यासाठी फक्त साधन आहे साध्य नाही.’ स्नेहा ही एक चांगली वाचक आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाव्यतिरिक्त ती अवांतर वाचन सुद्धा या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात करत आली आहे. ‘अवांतर वाचनामुळे माझ्या विचारात प्रगल्भता आणि स्पष्टता आली. ज्याची मदत मला स्पर्धा परीक्षेच्या या महाकुंभात यश मिळविण्यात झाली.’ असं ती सांगते.

आपल्या मुलीच्या निकालानंतर तिच्या आईवडिलांची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे ‘म्हणालो होतो ना तू करून दाखवणारच, विश्वास होताच आम्हाला.’ आई वडिलांच्या या विश्वासाचे स्नेहाने चीज करून दाखवले हे मात्र खरं. स्नेहा दिवसातून सरासरी आठ ते नऊ तास अभ्यास करायची. नियोजनबद्ध अभ्यासात सातत्य असेल तर यश तुम्ही खेचून आणू शकता हे स्नेहाच्या या प्रेरणादायी कहाणीवरून स्पष्ट होते. स्नेहासारखे किती तरी विद्यार्थी आहेत जे आपल्या यशाचा मार्ग शोधत आहेत. त्यांच्या वाटेत अनेक अडचणीही येत असतील अशा धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना, फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर इतरही क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्नेहा ही रोल मॉडेल म्हणून पुढे आली आहे. स्नेहाचा हा यशस्वी संघर्ष नक्कीच इतरांना प्रेरणा देणारा आहे.

जर तुमची इच्छाशक्ती दूर्दम्य आणि खंबीर असेल, तर जगातली कुठलीच परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. मग ती शारीरिक असेल मानसिक असेल वा आर्थिक. तुमच्यातल्या कमीचा बाऊ करू नका, कारण पुढे तीच कमी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवणार असते.

कु. स्नेहा सरोज राजाराम गायकवाड, (राज्य कर निरीक्षक )

हेही वाचा

Back to top button