पुणे विभागाचा आराखडा तयार; सातार्‍यातील काही आरोग्य केंद्रांत वापर सुरू

पुणे विभागाचा आराखडा तयार; सातार्‍यातील काही आरोग्य केंद्रांत वापर सुरू

पुणे : वैद्यकीय क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर केल्याने निदानामध्ये अचूकता आली आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांत त्याचा वापर करण्याची योजना सार्वजनिक आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. सातार्‍यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये याचा वापर सुरू झाला असून, पुणे विभागात अंमलबजावणी करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वच क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचा वापर देशात ठिकठिकाणी सुरू करण्यात आला आहे.

तामिळनाडूसह उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्यसेवेमध्ये 'एआय'चा वापर सुरू झाला आहे. त्याच धर्तीवर राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागही 'एआय'च्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्यासाठी लागणारा निधी, मनुष्यबळ याची उपलब्धता करणे हे मोठे आव्हान असणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील सुमारे 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तपासणीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यात एआय आधारित एक्स-रे, स्टेथोस्कोप, स्पायरोमेट्री आदींचा वापर केला जात आहे. यासाठी पाथ नावाच्या एजन्सीकडून आर्थिक सहकार्य लाभले आहे. त्याच धर्तीवर, शासकीय रुग्णालयांमध्ये एआयचा वापर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे समजते. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पुणे विभागातून सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.

आजारांच्या निदानात अचूकता

आजारांचे निदान, तपासणी आणि उपचार यात 'एआय'मुळे अचूकता येते. वेळेची बचत होते. रोबोटिक्स, डिजिटल उपकरणांसह एआयमुळे शस्त्रक्रिया अधिक सुलभतेने करता येतात. शासकीय रुग्णालयांना 'सीएसआर'च्या माध्यमातून निधी मिळाल्यास अधिकाधिक तपासण्या आणि उपचारांमध्ये एआयचा वापर करणे शक्य होणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

एआय तंत्रज्ञानाचा वापर राज्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांत एआयचा तपासणीसाठी वापर होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रयोग राबवण्यासाठी मोठ्या निधीची गरज भासू शकते.

– डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा

एआयसाठी कोणत्या घटकांची गरज?

  • कोट्यवधी रुपयांचा निधी
  • सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर, टेक्निशियन
    महागडी साधनसामग्री

एआयचा कोठे वापर करणे शक्य?

  • आजारांच्या निदानासाठी केल्या जाणार्‍या तपासण्या
  • गुडघा, खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  • रोबोटिक शस्त्रक्रिया

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news