तलाठी बनण्याचे स्वप्न अधांतरीच : 2 हजार उमेदवारांचे भवितव्य टांगणीला | पुढारी

तलाठी बनण्याचे स्वप्न अधांतरीच : 2 हजार उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील तलाठी परीक्षेतील 23 जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी 23 जानेवारीला जाहीर केली. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली. मात्र, उर्वरित आदिवासीबहुल 13 जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे या 13 जिल्ह्यांमधील तलाठी बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या सुमारे दोन हजार उमेदवारांचे भवितव्य तूर्त टांगणीला लागले असल्याचे दिसून आले आहे.

राज्यातून तलाठी पदाच्या

परीक्षेसाठी सुमारे बारा लाख अर्ज दाखल झाले. छाननीअंती 4466 जागांसाठी दहा लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांकडून हरकती, आक्षेप मागविणे, त्यांचे निराकरण आदी प्रक्रिया पूर्ण करून तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. भरतीचा पुढील टप्पा म्हणून 23 जानेवारी रोजी 23 जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली.

या 23 जिल्ह्यांमधील निवड यादीत अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती – अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा विविध प्रवर्गातील सुमारे 2526 उमेदवार आहेत. या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी आणि परीक्षेला जाताना उमेदवारांनी जो अंगठा यंत्रावर दिला आहे, निवड झालेल्या उमेदवाराचा आणखी एकदा अंगठा घेऊन परीक्षेला बसलेला आणि निवड झालेला उमेदवार तोच आहे का, याची तपासणी आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) 17 संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली. राज्यातील आदिवासीबहुल ठाणे, पालघर, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर या 13 जिल्ह्यांमधील सुमारे 1938 उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. या जिल्ह्यांमधील निवड, प्रतीक्षा यादी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button