पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्षांचे लेटरबॉम्ब : अध्यक्षांवर गंभीर आरोप | पुढारी

पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्षांचे लेटरबॉम्ब : अध्यक्षांवर गंभीर आरोप

पुणे  : पुढारी वृत्तसेवा : वकिलांची शिखर संघटना असणार्‍या पुणे बार असोसिएशनची दोनवेळा निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने गोंधळ उडाला असताना शुक्रवारी उपाध्यक्षांनी लेटरबॉम्ब टाकला. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. केतन कोठावळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अध्यक्षांनी निवडणुकांमध्ये जाणीवपूर्वक सर्व प्रक्रियेपासून लांब ठेवत मानसिक त्रास देऊन अपमानित केल्याचा आरोप केला आहे.  पुणे बार असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष अ‍ॅड. विश्वजित पाटील व अ‍ॅड. जयश्री बिडकर चौधरी यांनी अध्यक्ष अ‍ॅड. केतन कोठावळे, मुख्य निवडणूक अधिकारी अ‍ॅड. दादाभाऊ शेटे, उपनिवडणूक अधिकारी अ‍ॅड. योगेश देशमुख यांना पत्र लिहून गंभीर आरोपी केले आहे.
अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी 2024-25 निवडणुकीच्या पावती कमिटी, निवडणूक कमिटी व इतर प्रक्रियेबाबत कुठलीही विचारणा केली नाही. असा आरोप उपाध्यक्ष अ‍ॅड. पाटील आणि अ‍ॅड. बिडकर चौधरी यांनी केला. तसेच यापूर्वी घेण्यात आलेले सर्व निर्णय, कमिटीतील नेमणुका या एकतर्फी करण्यात आल्यात. त्यात सहभाग नसल्याचे नमूद केले आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी पुणे बार असोसिएशनची निवडणूक होणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगण्यात आले. संशयास्पद नावांची यादीच अंतिम यादी म्हणून जाहीर केली आहे. हे मतदार मतदानास उपस्थित राहिल्यावर त्यांच्या नावाची व ते प्रॅक्टीस करीत असलेल्या ठिकाणांची शहानिशा करण्याकरिता स्वतंत्र अधिकारी नेमून निवडणुकीच्या दिवशीच शहानिशा करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आपले म्हणणे कितपत योग्य आहे? 21 फेब्रुवारी रोजी निवडणूक घ्यावी आणि मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी, असे पत्रात नमूद केले आहे.
निवडणुकीबाबत बैठक घ्यायची आहे, हे वेळोवेळी सांगितले आहे. पण, कुणी आले नाही तर आम्ही काय करणार? बार असोसिएशनच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनात कार्यकारिणीमधील सर्वांना समान संधी दिली जाते.
– केतन कोठावळे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन 
हेही वाचा

Back to top button