परदेशी तरुणाकडून कोकेन जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई | पुढारी

परदेशी तरुणाकडून कोकेन जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या विदेशी नागरिकाला पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल 30 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 152 ग्रॅम वजनाचे कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. हसेनी मुवीनी मीचॉगा (वय 35, मु. रा. टांझानिया) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोन कोंढवा पोलिस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की, एक परदेशी नागरिक कोंढवा परिसरात उंड्री येथे सार्वजनिक रस्त्यावर कोकेन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित परदेशी इसमाला ताब्यात घेतले. आरोपी हा मुळचा टाझांनिया येथील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने भारतात आला. उंड्री या ठिकाणी तो सध्या राहात होता.

परंतु अमली पदार्थ विक्री करताना तो पोलिसांना मिळून आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कोंढवा पोलिस ठाण्यात एनडीपीसी कलम 8 (क), 21 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगांबर चव्हाण यांच्या पथकाने केली.

अडीच लाखांचा गांजा हस्तगत

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस गस्त घालताना पोलिस हवालदार रवींद्र रोकडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एम्प्रेस गार्डन गेटसमोर घोरपडी येथे सार्वजनिक रस्त्यावर गांजा हा अमली पदार्थ विक्री करताना ओंकार अनिल चंडालिया (वय 21, रा. उरुळी कांचन) याला पकडले. त्याच्या ताब्यातून दोन लाख 40 हजार रुपये किंमतीचा नऊ किलो गांजा, एक मोबाईल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साडेचार लाखांचे मेफेड्रॉन जप्त

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके आणि अमली पदार्थ विरोधी पथक दोन हे विश्रांतवाडी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण लोहगाव- धानोरी रस्त्यावर मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी किसन नंदकिशोर लधार (वय 34, रा. लोहगाव, मूळ रा. राजस्थान) या आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून चार लाख 40 हजार रुपये किंमतीचे 22 ग्रॅम मेफेड्रॉन व दहा हजारांचा एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button