कौटुंबिक पातळीवर एकटे पाडले जातेय; पण जनता माझ्यासोबत : अजित पवार | पुढारी

कौटुंबिक पातळीवर एकटे पाडले जातेय; पण जनता माझ्यासोबत : अजित पवार

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मी त्यांच्या (शरद पवार यांच्या) पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष मला मिळाला असता, पण मी त्यांच्या सख्ख्या भावाच्या पोटी तर जन्माला आलो आहे ना. मी आजवर त्यांच्यासाठी खूप काही केले आणि आता निवडणूक आयोगासह विधानसभा अध्यक्षांनीही बहुमताचा आदर करत निर्णय दिलेला असतानाही पक्ष चोरला म्हणून ते माझी बदनामी करत आहेत. कौटुंबिक पातळीवर मला एकटे पाडले जात आहे, पण कुटुंब सोबत नसले तरी जनता माझ्यासोबत आहे. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर मी खपवून घेणार नाही. मग कितीही टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिला.

कुटुंबातही मला एकटे पाडले जात आहे. तुमच्यासाठी काय काय केले हे तुम्ही विसरून जात आमचीच बदनामी का करता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीच्या ‘होमपिच’वरच ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, शरद पवार असे सर्वच पवार कुटुंब निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी बारामतीत होते, त्याचवेळी अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. बुथ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. भाजपसोबत सत्तेत जाण्याचा सर्वानुमते निर्णय झाला होता, परंतु वरिष्ठांनी नंतर यात सातत्याने चालढकल करण्याची भूमिका घेतली आणि स्वत:चे राजीनामा नाट्य घडवून आणले. त्यांना सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचे होते, असा टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना हाणला.

खा. सुळे यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. नुसते ’सेल्फी’ काढून आणि संसदेत भाषणे करून संसदपटू किताब मिळविल्याने प्रश्न सुटत नसतात. त्यासाठी विकासकामे करण्याची धमक लागते, मी जर आता इथे न येता मुंबईत बसून भाषणे करून, उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथे कामे बघीतलीच नसती तर कामे झाली असती का? खासदार आता टपरीवर चहा पिवू लागल्या आहेत. त्यांना 17 वर्षांनी चहा प्यायचे आठवले का. ते भावनिक करतील असे मी म्हटले होते. त्यात ध चा मा केला गेला. वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तिला अध्यक्ष केले असते तर आम्ही चांगले अन् नाही केले की बेकार, हे कसे चालेल.

जागा वाटपानंतरच बारामतीचा उमेदवार जाहीर

महायुतीचे जागा वाटप झाल्यावरच मी बारामतीचा उमेदवार जाहीर करेन. पण अजित पवारच उमेदवार आहे असे समजून काम करा, असे सांगून अजित पवार म्हणाले, मी पक्ष चोरलेला नाही. मी कालही राष्ट्रवादी होतो, आजही आहे, उद्याही राहील. हे उद्या एकत्र होतील, आपल्याला बनवतील, असा कोणताही संभ्रम मनामध्ये ठेवू नका.

पवार कुटुंबातील राजकारण चव्हाट्यावर

वरिष्ठ हे सध्या आमच्या कुटुंबातील प्रमुख आहेत. दुसरे प्रमुख पुण्यात राहतात. आता माझा परिवार सोडला तर ते सगळे एकत्र झाले आहेत. माझ्याविरोधात ते प्रचाराला उतरतील. कौटुंबिक पातळीवर मला एकटे पाडले जात आहे. पण कुटुंब सोबत नसले तरी जनता माझ्यासोबत आहे, असे म्हणत अजित पवार भाषणात भावनिक झाले. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर मी खपवून घेणार नाही. मग कितीही टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, अशा भाषेत अजित पवार यांनी कुटुंबातीलच सर्व राजकारण चव्हाट्यावर आणले.

हेही वाचा

Back to top button