मुंबई : पालिकेत तक्रार केल्याच्या रागातून फेरीवाल्यांकडून हॉटेलची तोडफोड | पुढारी

मुंबई : पालिकेत तक्रार केल्याच्या रागातून फेरीवाल्यांकडून हॉटेलची तोडफोड

घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा : हॉटेलसमोर रस्ता आडवून बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची तक्रार केली. म्हणून फेरीवाल्यांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. व हॉटेल मालकाला धमकावले. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ आज (दि.१५) हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चार फेरीवाल्यांवर दाखल केला.

गेल्या काही दिवसांपासून घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या एमजी रोड, खोत लेन, श्रद्धानंद रोड आणि हिराचंद देसाई मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. या विरोधात घाटकोपर परिसरातील नागरिकांनी फेरीवाल्यांना हटवून रस्ते मोकळे करण्यासाठी अभियान सुरु केले. याबाबत परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, उपायुक्त देविदास क्षीरसागर, सहायक आयुक्त गजानन बल्लाळे तसेच पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांची भेट घेऊन तीन हजार स्वाक्षरीचे पत्र दिले होते. यानंतर पोलिस आणि पालिकेने या मार्गावरून फेरीवाल्यांना हटविले. मात्र काही दिवसानंतर एमजी रोड, खोत लेन, श्रद्धानंद देसाई मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले परतले. या विरोधात पुन्हा नागरिकांनी तक्रारी सुरु केल्या, मात्र पालिकेच्या आधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आज फेरीवाल्यांनी बिपिन गुप्ता यांच्या हॉटेल समोरचा रस्ता अडवला. त्यानंतर गुप्ता यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पालिका अधिकारी या ठिकाणी पोहचताच फेरीवाले आक्रमक झाले. फेरीवाल्यांनी हॉटेलमधील साहित्य रस्त्यावर फेकून देत गुप्ता यांना धमकी दिली. त्यानंतर गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फेरीवाल्यांविरूद्ध तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घाटकोपर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button