जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहरविकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे 349.45 कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील विकास कामासाठी 109 कोटी 57 लाख रुपये मंजूर झाले आहेत. गेल्या 6 महिन्यांत जेजुरी गडावरील मुख्य मंदिर व पायरी मार्गावरील कामे प्रगतिपथावर असून, आतापर्यंत 15 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. राज्य शासनाने सन 2023 मध्ये गडासाठी 349 कोटी 45 लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करीत तो तीन टप्प्यांत राबविण्याचे नियोजन केले.
पहिल्या टप्प्यात 109 कोटी 57 लाख रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये मंदिर व संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 23 लाख रुपये, दीपमाळांचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 25 लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायर्या, 13 कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी 12 कोटी 22 लाख रुपये, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन व दुरुस्तीसाठी 12 कोटी 56 लाख रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन व दुरुस्तीसाठी 2 कोटी 2 लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन व दुरुस्तीसाठी 10 कोटी 73 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत 12 कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी 18 लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.
प्रत्यक्षात जुलै 2023 मध्ये कामाला सुरुवात झाली. दि. 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सप्टेंबरमध्ये मुख्य मंदिरातील गाभार्यात डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. सध्या तटबंदीची दुरुस्ती व जतन, जेजुरी गडकोटातील सर्व ओवर्या, सज्ज्यावरील आतील भागात वॉटरप्रूफिंग, प्रदक्षिणामार्गावर दगडी पायर्या बसविणे, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजाबाहेरील दगडी पायरी मार्ग तयार करणे ही कामे सुरू आहेत. पिंपळ वेशी परिसरात पायरी मार्ग दुरुस्ती, कठडे, कमान सुशोभीकरण, बानूबाई मंदिर, हेगडे प्रधान मंदिराबाहेरील कामे सुरू आहेत. मुख्य मंदिरातील गाभारा, सभागृहातील दगडी फरशी तसेच सभागृहातील दगडी खांबांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे. होळकर व पेशवे तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन दगडी कामे प्रगतिपथावर आहेत.
मागील अडीचशे वर्षे गडावर विकासकामे नाहीत
12व्या शतकात खंडोबा मंदिर निर्माण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनतर 18व्या शतकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीत जेजुरी गडाचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर सुमारे अडीचशे वर्षे गडावर कोणतीच विकासकामे झाली नाहीत.
पहिल्या टप्प्यातील सर्व कामे राज्य पुरातत्व विभागाद्वारे राबविण्यात येत असून, ती प्रगतिपथावर आहेत. लवथळेश्वर मंदिराचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी डॅमेज दिसून आल्याने सध्या हे काम बंद ठेवले आहे. हे कामही लवकरच सुरू होईल. गेल्या 6 महिन्यांत सुमारे 15 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नुकतेच या कामांचे 8 कोटी रुपयांचे बिल वितरित केले आहे. कडेपठार मंदिराकडे जाणार्या दोन मार्गांसाठी वन विभागाची परवानगी मिळाली आहे. कडेपठार मंदिराच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत.
– डॉ. विलास वाहने, संचालक, पुरातत्व विभाग