नाथाच्या वाडीची जलजीवन योजना कोणाच्या कल्याणासाठी? | पुढारी

नाथाच्या वाडीची जलजीवन योजना कोणाच्या कल्याणासाठी?

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील नाथाच्या वाडीतील सध्या चालू असलेल्या नळ पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी जवळपास 1 कोटी रुपये खर्च केला असून, ही योजना सुरू असताना त्याच ठिकाणी जलजीवन मिशन योजनेमधून पुन्हा 3 कोटी 95 लाख रुपयांची कामे सुरू केली आहेत. हा प्रकार एवढ्यावरच संपला नसून, ‘हर घर जल’ या योजनेतून परत 16 लाखांचे टेंडर नव्याने केले आहे. या गावातील एवढ्या पाणी योजना कोणाच्या फायद्यासाठी आहेत,असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. या सर्व योजनांचा खर्च 5 कोटी रुपये होत असून, एका वाडीसाठी एवढा खर्च का केला जातोय, याचा प्रश्न पडला आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांचे आर्थिक तडजोडीच्या भ्रष्ट कारभाराचे हे उत्तम उदाहरण म्हटल्यास चुकीचे ठरणारे नाही.

माटोबा तलावालगत वसलेल्या या वाडीची लोकसंख्या जवळपास साडेतीन हजारांच्या आसपास आहे. साधारण एक हजार उंबरठा असलेल्या गावासाठी मागील पाच वर्षांपूर्वी माटोबा तलावाच्या शेजारी विहीर खोदून पाण्याचा उद्भव निर्माण करून गावात नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आलेली आहे. ही योजना सध्या सुरू असून, गावकरी त्याचा लाभ घेत आहेत. या योजनेच्या वेळेसच गावामध्ये बर्‍यापैकी वाद झाला होता. योजनेत मोठा घोटाळा झाला म्हणून मात्र राजकीय आश्रयाने या ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

आता ही योजना सुरू असतानाच जलजीवन मिशन योजनेंतर्गत या गावासाठी नव्याने 3 कोटी 93 लाख 5 हजार रुपयांची निविदा रक्कम असणारी योजना कार्यान्वित केली आहे.आतापर्यंत काम किती टक्के केले ? हा विषय मोठा संशोधनाचा असला, तरी या योजनेमध्ये कोणती कामे करायची आहेत, हा प्रश्न मात्र अधिकार्‍यांनी ठेकेदाराच्या भल्यासाठी कसा करण्यात आलेला आहे हे थोडे उघडपणे स्पष्ट होताना दिसत आहे.

पहिल्या योजनेसाठी उद्भवाचा प्रश्न निर्माण झाल्याने तळ्यालगत विहीर खोदून साडेसात एचपीच्या पाणबुडी मोटारीने गावात पाणी देण्यात आलेले आहे. आता होत असलेल्या 3 कोटी 93 लाख रुपयांच्या योजनेमध्ये तळ्यातून थेट पाणी उचलण्यासाठी दोन साडेसात एचपीच्या मोटारी टाकून पाणी गावात घेण्याचा उपक्रम राबविलेला आहे. पहिल्या योजनेतील विहिरीतून गावात पाणी देण्यात आलेले आहेच,आता जलजीवनच्या दुसर्‍या योजनेत तळ्यातून गावात पाणी घ्यायचे आहे. तळे आणि विहिरी यामध्ये साधारण शंभर फुटाच्या आसपास अंतर आहे. या तळ्यातील पाझर होऊन पाणी बाराही महिने असते ते पाणी आतापर्यंत गावकर्‍यांना कमी पडलेले आहे अशी तक्रार आलेली नाही. मात्र, त्यालगतच तळ्यात दोन मोटारी टाकून पुन्हा पाणी गावापर्यंत नेण्याचा अभिनव उपक्रम जलजीवन विभागाने कशासाठी केलेला आहे, हा प्रश्न बारकाईने विचार घेतल्यास ठेकेदाराच्या भल्यासाठीच योजनेचा हा फंडा केला की काय, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

जलजीवन योजनेतील ठेकेदाराचे काम अतिशय धिम्या गतीने चाललेले आहे, त्यांची काम पूर्ण करण्याची मुदत 4 ऑक्टोबर 2023 रोजी संपलेली आहे. ठेकेदार मात्र कामगार गावाकडे गेल्याने काम थांबविल्याचे ग्रामस्थांना सांगत आहे. मुदत संपूनही पंचायत समितीच्या पाणी विभागाचे अधिकारी गप्प बसलेले आहेत. पहिली नळ पाणीपुरवठा योजना सुरू असताना दुसर्‍या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी होणारा चार कोटींचा खर्च हा खरंच एवढ्या रकमेचा लागणार आहे का, याची माहिती या विभागाने स्पष्टपणे दिल्यास पूर्वी झालेल्या योजनेच्या रकमेचा तपशील पाहता तिच्या तीनपट ही रक्कम का वाढली याचे उत्तर त्यांना देणे अवघड ठरणार आहे.

 

Back to top button