‘जलजीवन’च्या 43 कोटींच्या योजनेची बरबादी | पुढारी

‘जलजीवन’च्या 43 कोटींच्या योजनेची बरबादी

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  ‘हर घर जल’ योजना सुरू करण्यासाठी इनामगाव, बाभूळसर, तांदळी, गणेगाव दुमाला या गावांसाठी 43 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, निष्कृष्ट दर्जाचे काम पटपट उरकून संबंधित ठेकेदार हे काम लवकर संपविण्याच्या मार्गावर असल्याने या योजनेची बरबादी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या योजनेच्या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे काम निष्कृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे दुसर्‍या दिवशीही ग्रामस्थांनी हे काम सुरू करून दिलेले नाही. जोपर्यंत अधिकारी व ठेकेदार या ठिकाणी येत नाही तोपर्यंत काम बंदच राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अधिकारीही कामाची वेळोवेळी पाहणी करीत नसल्यामुळे त्याचा फायदा ठेकेदाराला होत आहे.

इनामगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तळ्यातील जे पायाचे जे काम सुरू आहे तेसुद्धा निष्कृष्ट दर्जाचे आहे, त्या कामांमध्ये ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची तळ्यामधील कामाची लेव्हल केलेली नसून पायामध्ये मोठे दगड खाली घालून मिक्स करून बांधकाम केले आहे. हे काम सुरू असताना जे काम झाले आहे, त्या बांधकामावर पाणी देखील वेळच्या वेळी मारले जात नसल्याने अनेक ठिकाणी या बांधकामाला तडे गेले आहेत. ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे दिसून आले त्या ठिकाणी उकरून पाहिले तर त्या ठिकाणी पूर्णपणे मुरूम दिसून आला. त्यामुळे काम दर्जेदार नसून निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे हे काम केले आणि केले नाही सारखेच आहे, असे सरपंच अनुराधा घाडगे यांनी सांगितले.

संबंधित ठेकेदार या ठिकाणी काम करीत असताना सिमेंट, खडी, मुरूम, वाळू याचा कमी प्रमाणात वापर केला जात असल्याने काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. अशाच प्रकारे ठेकेदाराने काम सुरू ठेवले तर भविष्यात या कामाला तडे जाऊ शकतात. त्यामुळे संबंधित ठेकेदारला काम जमत नसेल तर दुसर्‍या ठेकेदाराला काम द्यावे, असेही सरपंच अनुराधा घाडगे यांनी सांगितले.

Back to top button