एसी टॅक्सीचे दर अ‍ॅग्रीगेटरलाही लागू ; आरटीओ आणि ओला, उबेरच्या बैठकीत चर्चा | पुढारी

एसी टॅक्सीचे दर अ‍ॅग्रीगेटरलाही लागू ; आरटीओ आणि ओला, उबेरच्या बैठकीत चर्चा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आरटीओने (प्रादेशिक परिवहन प्राधिकरण) नुकतीच एसी टॅक्सीची भाडेवाढ करण्यास मान्यता दिली. तेच भाडेदर ओला, उबेर टॅक्सीला म्हणजेच अ‍ॅग्रीगेटर वाहनालादेखील लागू आहेत, असे आरटीओ अधिकार्‍यांनी ओला- उबेर कंपनीच्या अधिकार्‍यांना सांगितले. एसी टॅक्सीचे दर ओला- उबेर टॅक्सीकडून लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शहरातील अनेक टॅक्सी संघटना नाराज असून, त्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओ अधिकार्‍यांनी नुकतीच ओला- उबर कंपनीच्या अधिकार्‍यांशी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ओला- उबेर अधिकार्‍यांना ही माहिती दिली.

राज्याचे अ‍ॅग्रीगेटर धोरण कधी?
राज्यात अद्यापपर्यंत अ‍ॅग्रीगेटर संदर्भातील पॉलिसी लागू केलेली नाही. केंद्राच्याच पॉलिसीवर राज्यामध्ये अ‍ॅग्रीगेटर सेवा सुरू आहे. राज्य शासनाकडून अ‍ॅग्रीगेटर पॉलिसी तयार करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असून, याकरिता समितीची स्थापना केली आहे. त्या समितीद्वारे राज्याची अ‍ॅग्रीगेटर पॉलिसी तयार केली जाणार आहे. ही पॉलिसी लवकरात लवकर लागू करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

नुकतीच ओला- उबेरशी बैठक झाली. त्यात त्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नुकतीच मान्यता दिलेले भाडेदर अ‍ॅग्रीगेटरला लागू असल्याचे आम्ही सांगितले आहे.
                                                   – संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button