गांजा तस्करी प्रकरण : इंजिनीअरला बेड्या; गांजासह दोन मोबाईल जप्त | पुढारी

गांजा तस्करी प्रकरण : इंजिनीअरला बेड्या; गांजासह दोन मोबाईल जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गांजा तस्करी करण्यासाठी धुळ्यातून पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या सिव्हील इंजिनीअरसह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 27 किलो 325 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई 13 फेब्रुवारीला कात्रज परिसरात केली आहे. हरीओम संजय सिंग (वय 21, रा. धुळे ) आणि करण युवराज बागुल (वय 23, रा, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि वसंत सुभाष क्षिरसागर (वय 30, रा. श्री निवास अपार्टमेंट, तोरणा रेसिडेन्सी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे पथकासह हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कात्रज परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून हरीओम आणि करणला ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 4 लाख 84 हजारांचा 23 किलो गांजा, 22 हजारांचे दोन मोबाइल जप्त केले. त्यांच्याकडे गांजा विक्रीसाठी देणारा वसंत सुभाष क्षिरसागर (रा. आंबेगाव, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेत सव्वा चार किलो गांजा जप्त केला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, मारुती पारधी, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, रेहना शेख यांनी केली.

गांजा तस्कर उच्चशिक्षित

हरीओम संजय सिंग इलेक्ट्रीक दुरुस्तीची कामे करत असून त्याच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे. तर करण युवराज बागुल हा सिव्हिल इंजिनीअर असून त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. तर वसंत क्षिरसागर याचे शिक्षण बीबीएपर्यंत झाले आहे.

हेही वाचा

Back to top button