पाचवीसह आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारीला | पुढारी

पाचवीसह आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारीला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणार्‍या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, 6 हजार 183 परीक्षा केंद्रांवर 8 लाख 91 हजार 700 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यात पाचवीच्या 5 लाख 10 हजार 378, तर आठवीच्या 3 लाख 81 हजार 332 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. येत्या रविवारी (दि.18 फेब—ुवारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 1954-55 या शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यंदा राज्यातील 77 हजार 740 शाळांमधील 5 लाख 10 हजार 378 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, या विद्यार्थ्यांची परीक्षा 3 हजार 614 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. तसेच, इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी 28 हजार 504 शाळांमधील 3 लाख 81 हजार 322 विद्यार्थी परीक्षा देणार असून, या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी 2 हजार 569 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाचवीसाठी 16 हजार 693 शिष्यवृत्ती संच मंजूर आहेत, तर आठवीसाठी 16 हजार 588 संच मंजूर आहेत. आठवीसाठी दरमहा 750 रुपये तर पाचवीसाठी दरमहा 500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. राज्य परीक्षा या परीक्षेचे हॉल तिकीट 2 फेब—ुवारीपासून शाळेच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून हॉल तिकीट प्राप्त करून घ्यावे, अशा सूचना परीक्षा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्‍यांना शिष्यवृत्ती परीक्षा व्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना दिल्या आहेत. परीक्षेच्या काळात कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत, यासंदर्भातील सर्व दक्षता घेण्यात आल्या आहेत.

– डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

हेही वाचा

Back to top button