कचरा जाळल्याने आरोग्य धोक्यात ! | पुढारी

कचरा जाळल्याने आरोग्य धोक्यात !

देहूगाव : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीलगत मोठ्या प्रमाणात जाळला जात आहे. याचा नाहक त्रास रूपीनगर आणि तळवडे भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष

तसेच, श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत हद्दीतील कचरा गायरणात टाकला जातो. एवढेच नव्हे तर रात्रीचा फायदा घेऊन काही कंपन्यांमध्ये कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका दिला गेला आहे. असे काही ठेकेदार कचर्‍याचे डंपर भरून देहूतील कचरा डेपोमध्ये अनाधिकृतपणे कचरा आणून टाकत आहेत. याकडे देहू नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. भंगार गोळा करणारे काही लोक या कचर्‍याला आग लावतात. त्यामुळेदेखील या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

अधिवेशनातही गाजला विषय

या कचर्‍या संबंधात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि देहूगाव नगरपंचायतीने आपल्या हद्दीतील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभे करणे आवश्यक आहे. परंतु, या प्रश्नाकडे बोर्ड प्रशासन गांभीर्यपूर्वक पाहत नसल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात आमदार महेश लांडगे यांनी नागपूर येथील अधिवेशनात लक्षवेधी चर्चा करताना देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, देहूगाव आणि आळंदीमधील कचर्‍याचा वषय मांडला होता आणि मोशी कचरा डेपोवर येणारा ताण आणि तीर्थक्षेत्र देहूगाव व आळंदीमधील कचरा समस्येवर लक्ष वेधले होते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि देहूगाव नगरपंचायतकडे कचरा प्रकल्प नाही.

बोर्डाकडून संकलित होणारा दररोजचा कचरा रूपीनगर-तळवडे हद्दीलगत तर देहूगाव नगरपंचायतीचा कचरा गायरणात टाकून तो जाळला जातो. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या बाबत महापालिकेने देहूरोड बोर्डाला कचर्‍याची विल्हेवाट लावण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, बोर्डाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

हेही वाचा

Back to top button