तब्बल तीन वर्षांनंतर मोरया पार्क रस्त्याचे काम पूर्ण! | पुढारी

तब्बल तीन वर्षांनंतर मोरया पार्क रस्त्याचे काम पूर्ण!

नवी सांगवी : येथील साठ फुटी रोडवरील मोरया पार्क लेन नंबर 2 मधील रस्त्याचे काम तब्बल तीन वर्षांनंतर पालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. तीन वर्षांनंतर का होईना अखेर रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

नागरिकांनी अधिकार्‍यांना घातला होता घेराव

डिसेंबर 2022 मध्ये महापालिकेचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी परिसरात येताच येथील नागरिकांनी घेराव घालून ड्रेनेजलाईन, पाण्याचे प्रश्न, रस्त्याची उंची याबाबत तक्रारी केल्या होत्या. मोरया पार्क लेन नंबर 2 परिसर हा गेली तीन वर्षे समस्यांच्या विळख्यात होता. रस्त्याची दुरवस्था होऊन अक्षरशः चाळण झाली होती. सर्वत्र खडी वाळू पसरल्याने येथील अंतर्गत रस्ता धुळीने माखला होता. अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरची गळती होणे, चेंबर तुंबणे, चेंबरमधील तुंबलेले पाणी रस्त्यावर पसरणे, पाण्याच्या पाइपलाइनमधून अस्वच्छ पाणी येत असल्याचे आदी तक्रारी महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे केल्या होत्या.

या वेळी महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. खोदकाम सुरू असताना ड्रेनेज चेंबरची गळती, पाण्याच्या पाइपलाइनची तपासणी करून दुरुस्तीची कामे आढळल्यास ती त्वरित करून घेतली जातील, अशी माहिती याप्रसंगी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी येथील परिसरातील नागरिकांना दिली होती. येथील अंतर्गत रस्त्यासाठी नागरिकांनी गेली तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेला उशिरा का होईना जाग आली.

काम सुरू झाले तेव्हा मी ड्रेनेज विभागात येऊन चार महिने झाले होते. त्या वेळी येथील रस्त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या रस्त्यावरील निम्म्याच्या पुढे पाइपलाइन नव्याने टाकावे लागणार होती. ती कामे पूर्ण करून दिल्यानंतर स्थापत्य विभागास डांबरीकरण पूर्ण करण्याचे सांगण्यात आले.

– वंदना मोरे, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग

डिसेंबरमध्ये येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी एक फुटापर्यंत खोदकाम करून त्यावर दोन लेअर देणार होतो. मात्रख ड्रेनेजलाईनमुळे डांबरीकरण त्वरित करता आले नाही. या वेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक अडचणींवर मात करत त्वरित डांबरीकरण करून त्यांची होत असलेली गैरसोय दूर करून रस्ता डांबरीकरण पूर्ण करून देण्यात आला.

– स्वप्निल शिर्के, स्थापत्य विभाग

तीन वर्ष रखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने नक्कीच आनंद झाला आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी अखेर नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली.

– कल्पना घारू, स्थानिक

शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना खूप कसरत करावी लागत होती. डांबरीकरण पूर्ण झाल्याने मुले आनंदी झाली आहेत.

– अक्षता शेट्टी, स्थानिक

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

या रस्त्याच्यासंबंधी अनेकवेळा तक्रर करूनही अधिकारी मात्र सतत केराची टोपली दाखवीत होते. येथील परिसर स्मार्ट झाला आहे. मात्र, आम्ही नेमके स्मार्ट परिसरात रहात आहोत की नाही हेच समजत नव्हते, अशी तक्रार नागरिक करत होते. दर पावसाळ्यात इमारतीच्या पार्किंगमध्ये, बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान नागरिकांनी सहन केले आहे. याची महापालिकेकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. अखेर महापालिकेने या महिन्यातील दुसर्‍या आठवड्यात रात्री आठच्या सुमारास डांबरीकरण सुरू करताच स्थानिक नागरिकांच्या चेहर्‍यावर आनंद होत असल्याचे दिसून आले. या वेळी संबंधित अधिकारी स्वतः डांबरीकरण पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button