जेईई मुख्य परीक्षा : देशातील 23 विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल | पुढारी

जेईई मुख्य परीक्षा : देशातील 23 विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा- मुख्य (जेईई – मेन्स) या परीक्षेतील पेपर एकचा निकाल जाहीर केला. त्यानुसार देशभरातील 23 विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले असून, राज्यातील आर्यन प्रकाश, नीलकृष्ण गाजरे, दक्षेश मिश्रा या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एनटीएमार्फत जानेवारी सत्रातील जेईई मेन्स परीक्षा 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत एकूण 544 परीक्षा केंद्रांवर संगणकीय पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेसाठी 12 लाख 21 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यात 11 लाख 70 हजार 48 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. मराठीसह एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. जेईई मेन्स परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाते. जानेवारीमध्ये झालेल्या पहिल्या सत्रानंतर आता दुसर्‍या सत्राची परीक्षा 4 ते 15 एप्रिल या कालावधीत होणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर सर्वोत्कृष्ट निकालाच्या आधारे क्रमवारी तयार करण्यात येणार आहे. वास्तुकला आणि नियोजन या अभ्यासक्रमांसाठीच्या जेईई मेन्स परीक्षा पेपर 2 चा निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एनटीएने दिली.

परीक्षा केंद्रांवर होते ‘फाईव्ह जी जॅमर’

परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली होती. तसेच, परीक्षा केंद्रांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेल्या चित्रफित विश्लेषण आणि आभारी निरीक्षक पद्धतीचाही वापर करण्यात आला. तसेच, मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर अद्ययावत ’फाईव्ह जी जॅमर’ही लावण्यात आले होते.

हेही वाचा

Back to top button