Crime news : तरुणाचे अपहरण करीत बेदम मारहाण | पुढारी

Crime news : तरुणाचे अपहरण करीत बेदम मारहाण

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  ‘तू लय वाढीवपणा करतोय, आमच्याकडे चुकीला माफी नाही,’ असे म्हणत तरुणाला बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याला वन विभागाच्या हद्दीत नेत बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चौघांविरोधात माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कर्‍हावागज (ता. बारामती) येथे गुरुवारी (दि. 8) ही घटना घडली. गणेश तात्याराम गावडे (वय 19, रा. कर्‍हावागज, ता. बारामती) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी करण दत्तू बोडरे, अंकुश गौतम मोरे, तेजस मोरे आणि प्रणव सोनवणे (सर्व रा. कर्‍हावागज, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गावडे हा गुरुवारी सायंकाळी दुचाकीवरून भैरवनाथ मंदिराकडे जात होता. करण बोडरेच्या घराजवळ तेजस मोरेने त्याला बोलावले. तो तेथे गेला असता तेथे करण, अंकुश, तेजस हे होते. करण हा त्याला ‘तू लय वाढीवपणा करतो आहे,’ असे म्हणाला. ‘मी काय वाढीवपणा केला,’ अशी विचारणा फिर्यादीने केली. त्यावर तेजसने ‘आमच्याकडे चुकीला माफी नाही,’ अशी धमकी दिली. करणने घरातून गज आणला. गणेशला शिवीगाळ, दमदाटी करत गालावर चापट मारल्या. गज डाव्या हातावर मारला. त्यांच्या तावडीतून सुटून गणेश हा पळून जात असताना तिघांनी पकडून बेदम मारहाण केली.

अंकुशने दुचाकी चालू केली. गणेशला बळजबरीने दुचाकीवर बसवून वन विभागाच्या हद्दीत महादेव मंदिरालगत नेत बेदम मारहाण केली. मारहाणीबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याचीच चूक असल्याचे बोलायला लावत व्हिडिओ काढला. गणेशला मारहाणीमुळे चालता येत नव्हते. त्याने रोहन सांगळेला फोन करत बोलावून घेतले. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Back to top button