Hinjewad : समाविष्ट गावांच्या घोषणेनंतर चर्चांना उधाण.. | पुढारी

Hinjewad : समाविष्ट गावांच्या घोषणेनंतर चर्चांना उधाण..

हिंजवडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयटीनगरी हिंजवडीसह पाच गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार असल्याचे सूतोवाच केले होते. आता याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत. अजित पवार यांनी याबाबत वेळीच निर्णय घेऊन येथील बकालीकरण थांबवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याबाबत सल्ला दिला होता. या गावांबाबत फेब्रुवारी 2015 साली प्रथम ग्रामपंचायतकडे अहवाल मागवण्यात आले होते; परंतु त्यानंतर केवळ चर्चा आणि अहवाल या लालफितीच्या कारभारातच गावांचे भवितव्य अडकले आहे.

विकासकामांना गती मिळण्याची आशा या गावांमध्ये सध्या पाणी, कचरा, सांडपाणी, वाहतूक असे गंभीर प्रश्न उभे आहेत. त्याबाबत उपाययोजना करण्यात स्थानिक प्रशासन कमी पडत आहे. ग्रामपंचायतस्तरावर या मूलभूत सुविधादेखील पुरवल्या जात नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे वेळीच ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावीत किंवा स्वतंत्र नगर परिषद स्थापन करावी, याबाबत वेळोवेळी चर्चा होत असते. मात्र, अद्यापही याबाबतीत निर्णय होत नाही. अनेकदा ग्रामपंचायतच्या स्तरावरील सत्ताधारी आणि पदाधिकारी यास विरोध करतात. नागरिकांमध्येदेखील याबाबतीत संभ्रम असल्याने योग्य निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. राज्य सरकारने याबाबतही केवळ घोषणा करून थांबू नये, याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

अजित पवार विकासाच्या बाबतीत अतिशय तत्पर आहेत. ते आपली भूमिका स्पष्ट मांडतात. येथील बकालीकरण वाढत आहे. ग्रामपंचायतीला सोयीसुविधा पुरवणे अवघड होत असल्याने त्याबाबत वेळीच निर्णय घ्यावा. विशेषतः निवडणुकीपूर्वीच याची घोषणा करून ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत.

– वसंत साखरे, माजी संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

नेरे-जांबेसारख्या ग्रामपंचायतींवरदेखील वाढत्या रहिवासी करणाचे परिणाम दिसत आहेत. गुंठा-दोन गुंठे जागेत बांधकाम करून राहणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेकदा कोणताही कर न भरणारी नागरिकदेखील ग्रामपंचायतच्या सुविधांचा लाभ घेतात. त्यामुळे वेळीच यावर आवर घालणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका हा सक्षम पर्याय आहे.

– संदीप जाधव, अध्यक्ष, पोलिस मित्र संघटना

ग्रामपंचायतस्तरावर अनेकदा विकासाच्याबाबतीत काही प्रमाणात मर्यादा येत असतात. मात्र, तरीदेखील अनेक ग्रामपंचायती उत्कृष्ट काम करत आहेत. महापालिकेपेक्षा स्वतंत्र नगर परिषद झाल्यास त्यासाठी योग्य तरतूद केली जाऊ शकते.

– शिवाजी बुचडे पाटील, संचालक,

कृषी उत्पन्न बाजार समिती, मुळशी ग्रामपंचायतच्या माध्यमातून योग्य पद्धतीने विकास होत आहे. अनेक विकासकामे मार्गी लागत आहे. माण ग्रामपंचायत याबाबतीत अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. रस्ते, पाणी, वीज याबाबतीत ग्रामपंचायत अग्रेसर आहे. त्यामुळे महापालिकेपेक्षादेखील ग्रामपंचायत हा सक्षम पर्याय आहे.

– अर्चना आढाव, सरपंच, माण ग्रामपंचायत

हेही वाचा

Back to top button